गेल्या चार दशकांत बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणावर दबदबा निर्माण केलेले राजकारणी म्हणजे मंत्री उमेश कत्ती. प्रचंड धडाडी, तडकाफडकी निर्णय आणि बंडखोरी यशस्वी करण्याची क्षमता असलेल्या उमेश कत्ती यांची राज्यभरात वेगळीच ओळख होती. आगामी काळात देशात अनेक राज्ये निर्माण होणार आहेत. त्यामुळे वेगळ्या उत्तर कर्नाटकासाठी लढणार्या या नेत्याचे 61 व्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.
उमेश कत्ती हे सध्या अन्न व नागरी पुरवठा आणि वन मंत्री म्हणून कार्यरत होते. त्यांनी गेल्या चार दशकांपासून हुक्केरी मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. कत्ती यांनी लढलेल्या नऊ पैकी आठ निवडणुका जिंकून राज्याच्या राजकारणात विक्रम निर्माण केला होता.
चार दशकांच्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत त्यांनी प्रतिनिधित्व केलेल्या जनता दल (निधर्मी), जनता दल (संयुक्त) आणि भाजपमध्ये कायम आपले नाव चर्चेत ठेवले होते. ते आपल्या मागणीवर नेहमीच ठाम राहायचे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांची संख्याही मोठी आहे. त्यांची लोकप्रियता आणि उत्तर कर्नाटकातील शक्तिशाली लिंगायत समाजाकडून त्यांना मिळालेला मोठा पाठिंबा यामुळे ते मुख्यमंत्रिपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून ओळखले जात होते.
14 मार्च 1961 रोजी जन्मलेले ते हुक्केरी येथील श्रीमंत कत्ती कुटुंबातील आहेत. त्यांनी 80 च्या दशकाच्या सुरुवातीस राज्याच्या राजकारणात प्रवेश केला आणि 1985 मध्ये त्यांचे वडील आमदार विश्वनाथ कत्ती यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक लागली. त्यामध्ये उमेश कत्ती यांना पहिल्यांदा आमदार होण्याचा मान मिळाला. तेव्हापासून त्यांनी नऊ विधानसभा निवडणुका लढवल्या असून त्यापैकी आठ जिंकल्या आहेत. 2004 मध्ये भाजप उमेदवार शशिकांत नाईक यांच्या विरोधात त्यांचा पराभव झाला होता.
1985 मध्ये जनता दलातून त्यांनी आमदारपद मिळवले. त्यांनी हुक्केरीमध्ये लोकप्रियता मिळवली. तेव्हापासून राजकीय क्षेत्रात वर्चस्व राखले आहे. कत्ती घराण्याला लोकांचे सातत्याने पाठबळ मिळाले. चिकोडीचे माजी खासदार, उमेश यांचे भाऊ रमेश कत्ती यांनी अनेक निवडणुका जिंकल्या आहेत आणि सध्या त्यांच्याकडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद आहे. जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व वाढावे यासाठी भाजपने उमेश आणि रमेश या दोन्ही भावांना 2008 मध्ये पक्षात प्रवेश करून घेतला. तेव्हापासून उत्तर कर्नाटक भागात विशेषतः बेळगाव जिल्ह्यात भाजपला जास्त जागा जिंकता आल्या.
रमेश कत्ती यांनी 2009 च्या लोकसभा निवडणुकीत चिकोडी मतदारसंघातून काँग्रेसचे प्रभावशाली राजकारणी प्रकाश हुक्केरी यांचा पराभव केला. उमेश कत्ती यांनी 1985 मध्ये जनता दलाकडून विधानसभेसाठी निवडणूक लढवली होती. 2008 मध्ये त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली, परंतु बी. एस. येडियुराप्पा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने त्यांना मंत्रिमंडळात समाविष्ट केले नाही. पण, त्याचा फटका जिल्ह्यातील पक्षाला बसू शकतो, याची जाणीव होताच आणि पक्षातील बंडखोरी रोखण्यासाठी उमेश कत्ती यांना प्रमुख खाते दिले.
उमेश कत्ती 2011 ते 13 पर्यंत जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांच्या कार्यकाळातच जागतिक कन्नड संमेलन बेळगावात आयोजित करण्यात आले होते. कृषी मंत्री असताना शेतकर्यांसाठी विविध योजनांची सुरुवात त्यांनी केली. त्यांनी राज्यात पहिल्यांदाच कृषी बजेट सादर केले होते. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत बागायत, कारागृह, साखर, कृषी, अन्न आणि नागरीपुरवठा, पाटबंधारे मंत्री म्हणून काम पाहिले आहे.
उमेश कत्ती यांचे वडील विश्वनाथ कत्ती आमदार होते. पुढे उमेश कत्ती यांच्या पुढाकारामुळे 2009 साली भाऊ रमेश कत्ती हे खासदार झाले. त्यांनी मुरब्बी राजकारणी प्रकाश हुक्केरी यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी मुलगा निखिल आणि रमेश यांचा मुलगा पवन यांच्या राजकीय कारकिर्दीलाही सुरुवात करून दिली आहे. दोघांनीही जिल्हा पंचायत सदस्य म्हणून काम पाहिले आहे. सहकार चळवळीत योगदान हुक्केरी तालुक्यातील बेल्लद बागेवाडी हे कत्ती कुटुंबीयांचे गाव. या गावातूनच सहकार चळवळीला प्रारंभ करण्यात आला. विश्वनाथ कत्ती साखर कारखाना, संकेश्वरचा हिरण्यकेशी साखर कारखाना, बेल्लद बागेवाडी सहकारी संस्था आदींनी राज्यात कामाचा ठसा उमटवला आहे. म्हणूनच कत्ती कुटुंबीयांचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर वर्चस्व राहिले आहे
राज्यात आठ वेळा हुक्केरी मतदारसंघातून आमदार म्हणून विजयी
शशिकांत नाईक यांच्याकडून 2004 मध्ये पराभव
राज्यात चारवेळा वेगवेगळी मंत्रिपदे, जिल्ह्याचे पालकमंत्रिपद
उमेश कत्ती यांनी राज्याच्या राजकारणात उत्तर कर्नाटकाला नेहमीच सावत्र वागणूक दिली. विकासाला चालना मिळाली नाही, असा आरोप करत स्वतंत्र उत्तर कर्नाटक राज्याची मागणी लावून धरली होती. त्यासाठी ते वारंवार लढ्याची भाषा करत होते. त्यातूनच स्वतंत्र उत्तर कर्नाटकाच्या मागणीला वेग आला आहे. 2024 पर्यंत वेगळे उत्तर कर्नाटक राज्य अस्तित्वात येईल आणि आपण किंवा इतर कोणीतरी त्याचा मुख्यमंत्री असेल, असे ते वारंवार सांगत होते. पण, त्यांच्या निधनामुळे हे स्वप्न अधुरेच राहिले.
-जितेंद्र शिंदे, बेळगाव