बेळगाव : रिंगरोडविरोधात आज रास्ता रोको

बेळगाव : रिंगरोडविरोधात आज रास्ता रोको

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा ;  विरोध असतानाही रिंगरोडचा प्रयत्न करणाऱ्या प्रशासनाला जाब विचारण्यासाठी सोमवारी (दि. २३) सकाळी १०.३० वाजता झाडशहापूर येथे राष्ट्रीय महामार्ग अडवण्यात येणार आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

रिंगरोड रद्द व्हावा, यासाठी विविध गावांमध्ये जनआक्रोश आंदोलन, रास्ता रोको आदी प्रकारची आंदोलने केली जात आहेत. झाडशहापूर येथे होणारा रास्ता रोको भव्य प्रमाणात व्हावा, यासाठी गेल्या काही दिवसांपासून गावांमध्ये जनजागृती करण्याचे काम हाती घेण्यात आले असून संतीबस्तवाड, वाघवडे आदी ठिकाणी बैठका घेऊन शेतकऱ्यांना रास्ता रोकोमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रिंगरोडमुळे सर्वाधिक नुकसान झाडशहापूर गावाचे होणार असून शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत शेतजमीन वाचवण्याचा निर्धार केला आहे. तसेच गावातील प्रत्येकजण आंदोलनात सहभागी होणार असून तालुका समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गावात बैठक घेऊन रास्ता रोको आणि येणाऱ्या काळात हाती घेतल्या जाणाऱ्या आंदोलनाबाबत माहिती दिली आहे.

आपली जनावरे घेऊन शेतकरी आंदोलनात सहभागी होणार असून देसूर, मच्छे, पिरनवाडी या भागातील शेतकरी व नागरिकांनादेखील आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रास्ता रोको आंदोलन झाल्यानंतर वाघवडे भागातील वीज पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी निवेदन दिले जाणार आहे. अशी माहिती तालुका समितीतर्फे देण्यात आली आहे.

रिंगरोडविरोधात झाडशहापूर येथील रास्ता रोको आंदोलनात सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. यासाठी जनजागृती करण्यात आली आहे. त्यामुळे आंदोलन यशस्वी होणार आहे. पुढील दिवसात विविध गावांमध्ये आंदोलने केली जाणार आहेत.
– मनोहर किणेकर, कार्याध्यक्ष, म. ए. समिती

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news