बेळगाव : म. ए. समिती उमेदवार निश्चिती १३ पर्यंत; प्रत्येक मतदारसंघात एकेकच उमेदवार

महाराष्ट्र एकीकरण समिती
महाराष्ट्र एकीकरण समिती

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : विधानसभा निवडणुकीबाबत सर्वच पक्षांत धाकधूक दिसून येते. काँग्रेसने काही मतदारसंघ वगळता इतर ठिकाणी निवड प्रक्रिया सुरू केली आहे. भाजपकडूनही विचारमंथन सुरू आहे. अशा स्थितीत म. ए. समितीने १३ एप्रिलपर्यंत आपले सर्व उमेदवार जाहीर करण्याचे संकेत दिले आहेत. रविवारी (दि. २) झालेल्या शहर आणि तालुका म. ए. समिती बैठकीत यावर निर्णय झाला आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीने यंदा बेळगाव ग्रामीण, बेळगाव दक्षिण, बेळगाव उत्तर, खानापूर, यमकनमर्डी आणि निपाणी असे सहा मतदारसंघ लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निवड समितीची रचना करण्यासाठी आज शहर आणि तालुका म. ए. समितीची बैठक झाली. या बैठकीत कार्यकर्त्यांनी उमेदवारांची निवड प्रक्रिया पारदर्शक आणि वेगवान करण्यात यावी, अशी मागणी केली. त्यानुसार म. ए. समिती नेत्यांनी निवड समितीची रचना करणे, इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवणे आणि निवड प्रक्रिया राबवण्याचा निर्धार केला.

महाराष्ट्र एकीकरण समितीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी अनेकजण इच्छूक आहे. पण, नेत्यांनी लवकरात लवकर उमेदवार जाहीर करून प्रचाराला वेग आणावा, अशी मागणी सातत्याने होत आली आहे. आता निवडणूक वेळापत्रक जाहीर झाले असल्यामुळे म. ए. समितीने कार्यकर्त्यांची बैठक बोलावून या प्रि क्रयेला चालना दिली आहे. सध्या काँग्रेसने काही ठिकाणी उमेदवारी जाहीर केली आहे. तर भाजपकडून १० एप्रिलपर्यंत उमेदवार निश्चित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे म. ए. समिती कार्यकर्त्यांतही धाकधूक लागून होती. आता उमेदवार निवड प्रक्रिया १३ एप्रिलपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

तालुका म. ए. समितीने उमेदवार निवड प्रक्रिया राबवून १३ एप्रिल रोजी उमेदवारी जाहीर करण्यात येणार असल्याचा निर्णय केला आहे. शहर म. ए. समितीनेही या दरम्यानच उमेदवार जाहीर करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे म. ए. समिती इच्छुक उमेदवारांचे लक्ष निवड समितीवर लागून आहे. तालुक्यात १०१ जणांची निवड समिती असणार आहे. ही निवड समिती निवडण्याची जबाबदारी ११ जणांवर देण्यात आली आहे. तर शहर समितीने बेळगाव दक्षिण मतदारसंघात सहा जणांवर निवड समिती निवडण्याची जबाबदारी दिली आहे.
बेळगाव उत्तर मतदार संघात अकरा जणांची निवड समिती होणार असून ही समिती निवडण्याची जबाबदारी चौघांवर देण्यात आली आहे. त्यामुळे म. ए. समितीकडून निवडणुकीबाबत हालचाली वाढल्या आहेत.

येथे होणार अर्ज दाखल

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत ठरल्यानुसार बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील इच्छुकांनी सोमवारपासून (दि. ३) ७ एप्रिलपर्यंत कॉलेज रोड येथील कार्यालयात अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. तर शहर म. ए. समितीकडून बेळगाव दक्षिण आणि बेळगाव उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी रामलिंगखिंड गल्ली येथील रंगुबाई भोसले पॅलेसमध्ये मंगळवारपासून (दि. ४) ६ एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news