

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्र्यांचा फोटो वापरून 'पे सीएम' पोस्टर झळकवल्याप्रकरणी काँग्रेसचे सोशल मीडिया प्रमुख बी. आर. नायडू यांच्यासह पाचजणांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. भाजप सरकारकडून सुडाचे राजकारण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. नायडूसह पवन, गगन, संजय आणि विश्वनाथ अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
आणखी काही काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. शहरातील काही ठिकाणी 'पे सीएम' शीर्षक मुद्रित करून पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. याविरुद्ध चार विविध पोलिस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार हाय ग्राऊंडस् आणि सीसीबी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. कार्यकर्त्यांना अटक झाल्याचे समजल्यानंतर शिवकुमार यांनी त्यांची भेट घेतली. पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, कार्यकर्त्यांची रातोरात धरपकड सुरू आहे. राज्यात 40 टक्के कमिशन घेणारे सरकार आहे. याविरुद्ध काँग्रेसने तीव्र आंदोलन छेडले आहे.
मुख्यमंत्र्यांनी याविषयी सुडाचे राजकारण सुरू केले असून राजकीय द्वेषातून काँग्रेस कार्यकर्त्यांना अटकेचे आदेश दिले आहेत. शुक्रवारी काँग्रेसचे आमदार, विधान परिषद सदस्य एकत्र येत असून 'पे सीएम' पोस्टर प्रदर्शित करतील. सरकारी कार्यालयांवर पोस्टर चिकटवले जातील. काँग्रेसने प्रदर्शित केलेल्या पोस्टरवरील क्यू आर कोड 1.9 लाख जणांनी डाऊनलोड केले आहे. 8 हजार तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. आता आंदोलन आणखी तीव्र केले जाणार असल्याचा इशारा डी. के. शिवकुमार यांनी दिला.
चाळीस टक्के कमिशनच्या आरोपावर काँग्रेस ठाम आहे. त्यांच्याच पक्षातील आमदार यत्नाळ यांनी मुख्यमंत्रिपदासाठी 2500 कोटींचे डील केले जात असल्याचा आरोप केला होता. विेशनाथ, मठाधीशांनी केलेल्या विधानांवर कधीच समन्स बजावले नाही. पण, काँग्रेस आमदार प्रियांक खर्गे यांनी आरोप केल्यानंतर त्यांना समन्स बजावला. विधानसौधसमोर कंत्राटदार संघाने सरकारवर थेट आरोप केला. त्यावेळी त्यांच्यावरही खटला दाखल झाला नाही. पण, काँग्रेसच्या बाबतीत सूडाचे राजकारण केले जात असल्याचा आरोप शिवकुमार यांनी केला.