बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : महापालिका महापौर, उपमहापौर निवडणूक प्रक्रिया बरोबर ३ वाजता सुरू करण्यात आली. त्याआधी सर्व नगरसेवकांना सभागृहात प्रवेश देण्यात तीन मिनिटांचा उशीर झालेल्या तीन नगरसेवकांना निवडणूक प्रक्रियेत भाग घेता आला नाही. त्यांनी काही काळ धरणे आंदोलन केले. पण, निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतरच त्याची दखल घेण्यात आली.
महापौर, उपमहापौर निवडणुकीसाठी काँग्रेस नगरसेवक सोहेल संगोळी, खुर्शिदा मुल्ला आणि झरिना खान यांना सभागृहात दाखल होण्यासाठी तीन मिनिटांचा उशीर झाला. तीन वाजता सभागृहाचा दरवाजा बंद करून त्याठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवला होता. सभागृहातून प्रसार माध्यमांनाही बाहेर काढण्यात आले होते. तिन्ही नगरसेवकांनी सभागृहात जाण्यासाठी विनंती केली. पण, त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे अखेर त्यांनी दरवाजासमोर धरणे आंदोलन केले. अखेर पोलिसांनी त्यांना बाहेर काढले. निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतरच त्यांची दखल घेण्यात आली.
त्यांना शपथ मिळाली
निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेण्याबरोबरच तिन्ही नगरसेवकांना नगरसेवक पदाची शपथ घ्यायची होती. त्यामुळे त्यांनी आम्ही निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेणार नाही. पण, शपथ घेऊ द्या, अशी विनंती केली. तरी त्याची दखल घेण्यात आली नाही. प्रक्रिया संपल्यानंतर निवडणूक अधिकारी एम. जी. हिरेमठ यांना काँग्रेस नगरसेवकांनी याबाबत विचारले असता, त्यांना शपथ देण्यात येईल, असे सांगितले. त्यानुसार बैठक पार पडल्यानंतर त्यांना शपथ देण्यात आली.