गोकाक : पुढारी वृत्तसेवा : राजेश झंवर या व्यापायाला कर्जापोटी २२ गुंठे जमीन लिहून दिली होती. घेतलेली रक्कम दोन वर्षांनी व्याजासह परत द्यायला गेलो होतो; पण झंवर यांना रक्कम नको होती, जमीनच पाहिजे होती. म्हणून ते जमिनीची कागदपत्रे देण्यास तयार नव्हते. याच कारणातून झंवर यांचा खून केल्याची माहिती डॉ. सचिन शिरगावी (वय ३६, रा. गोकाक ) याच्या प्राथमिक चौकशीतून उघड झाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
ही माहिती पोलिसांना स्वतः डॉ. सचिन याने दिली आहे. मात्र, दुसरी बाजू नेमकी काय आहे, हे अद्याप अस्पष्ट आहे. याशिवाय राजेशचा खून झाला असेल तर मृतदेह अजूनही सापडलेला नाही. खुनानंतर मृतदेह घटप्रभा उजव्या कालव्यात टाकल्याचे मारेकऱ्यांचे म्हणणे आहे. हा कालवा बागलकोट जिल्ह्याला जाऊन मिळतो. गुरुवारी दिवसभर बागलकोटपर्यंत जाऊन पोलिसांनी कालव्यात मृतदेहाचा शोध घेतला. मात्र, मृतदेह सापडला नाही.
व्यापारी राजेश झंवर हे डॉक्टरकडे जातो म्हणून गेले, ते तेथून बेपत्ता झाल्याची फिर्याद झंवर यांच्या पत्नीने गोकाक पोलिसांत शनिवारी दिली. त्यांनी डॉक्टरांवर संशय व्यक्त केला होता. सोमवारी गोकाक पोलिसांनी डॉ. सचिन व डॉ. शिवानंद काडगौडा पाटील (३२, दोघेही रा. गोकाक ) यांना अटक केली. त्यांच्याकडून राजेश यांचा खून झाल्याची माहिती मिळाली.
कथित खुनात मदत करणारा तिसरा संशयित शाफत इर्शाद अहमद त्रासगार (वय २५, रा. गोकाक ) यालाही अटक करण्यात आली आहे. शाफत हा रेफ्रिजरेटर दुरुस्तीचे काम करतो. त्याचे आणखी दोघे साथीदार मोईन पटेल, अताला हे दोघे फरारी असून त्यांचा शोध सुरू आहे.
दोन वर्षांनी कर्ज रकमेच्या ५० लाखांत २० लाख रुपये जादा रक्कम घालून परत देण्याचेही करारात ठरले. त्यानंतर डॉ. सचिन यांच्या म्हणण्यानुसार रक्कम आल्यानंतर सहा महिन्यांपूर्वी त्याने झंवर यांना ३९ लाख रूपये दिले. त्यानंतर उर्वरित ३१ लाखाची रक्कमही सचिनने जमवली. ती रक्कम देण्यासाठी सचिन झंवर यांच्याशी बोलणी करत होता. पण मोक्याची जागा असल्याने व त्याचे विक्री करारपत्र झालेले असल्याने ती जमीन परत करण्याचा झंवर यांचा इरादा नव्हता. शिवाय विक्री करारपत्र झालेले असल्याने डॉक्टर काहीही करू शकत नव्हता. त्यामुळे झंवर रक्कम परत घेऊन जमिनीची कागदपत्रे देण्यास जाण्यास टाळाटाळ करत होते. यातून रागाच्या भरात हा खून झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तथापि, हा नेमका व्यवहार काय होता ही माहिती आता झंवर कुटुंबियांकडून घेण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.
प्रकरणाच्या तपासासाठी जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांच्या सूचनेनुसार तीन पथके कार्यरत आहेत. दोन पथके कालव्याच्या बाजूने मृतदेहाचा शोध घेत आहेत, तर तिसरे पथक दोघा संशयित फरारींचा शोध घेत आहे. या प्रकरणात डॉ. सचिनने शाफतला बोलावून घेतले होते. शाफत आपले दोघे साथीदार मोईन पटेल व अबुताला यांना घेऊन आला होता. ते दोघे फरारी असून त्यांचा शोध गोकाकचे उपनिरीक्षक एम. डी. घोरी व त्यांचे सहकारी घेत आहेत.
झंवर यांचा खून करून मृतदेह घटप्रभा उजवा कालव्यात टाकल्याची माहिती डॉ. सचिन व अन्य दोघांनी दिली आहे. गेल्या पाच दिवसांपासून कालव्यातील पाणी उपसा करून मृतदेहाचा शोध सुरू आहे. हा कालवा बागलकोट जिल्ह्यात जात असल्याने गुरुवारी बागलकोट जिल्ह्यातही पोलिसांनी मृतदेहाचा शोध घेतला. परंतु, हाती काहीही लागलेले नाही.
पोलिसांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार राजेश सत्यनारायण झंवर (वय ५२, रा. गोकाक ) हे गोकाक येथील मोठे व्यावसायिक. डॉ. सचिन याने हॉस्पिटल उभारण्यासाठी राजेश झंवर यांच्याकडे ५० लाख रुपयांची मागणी केली होती. यावेळी झंवर यांनी रक्कम देतो, परंतु, यासाठी काहीतरी तारण द्यावे लागेल, असे सांगितले होते. डॉ. सचिनने आपली २२ गुंठे बिगरशेती जमीन विक्री करारपत्रावर झंवरना दिली. झंवर यांनी आपला भाऊ मनोज यांच्या नावे २२ गुंठे जागेचा विक्रीकरार करून घेऊन डॉ. सचिन यांना ५० लाख रुपये दिले होते.