बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : तालुक्याच्या उत्तर भागात येणाऱ्या भुतरामहट्टी, काकती जंगल विभागात गव्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे परिसरात येणाऱ्या कट्टणभावी, बंबरगा, आदी गावांमधील शेतकऱ्यांना गव्यांचा उपद्रव सहन करावा लागला आहे.
काकती जंगल विभागात येणाऱ्या भागात गव्यांची संख्या वाढली आहे. हरण, सांबर, जंगली डुक्कर आदी जंगली प्राण्यांचे वास्तव्य आहे.
गव्यांच्या उपद्रव परिसरातील शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. सध्या या भागात ज्वारीचे पीक बहरात आहे. रात्रीच्यावेळी गवे शेतांमध्ये शिरुन पिकांचे नुकसान करीत आहेत. घुग्रेनहट्टी येथील बसवंत कुराडे यांच्या शेतातील ज्वारी पीक फस्त केले. याचा आर्थिक फटका बसला आहे.
जंगली प्राण्यांकडून चारा फस्त केल्याने शेतकऱ्यांना चारा समस्येला सामोरे जाण्याची भीती निर्माण झाली आहे. वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेण्याची मागणी केली जात आहे. नुकसानीचा सर्व्हे करुन भरपाई देण्याची मागणी होत आहे.