

संबरगी; पुढारी वृत्तसेवा: विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे राज्यातील विकासकामांच्या धडाक्याला ब्रेक लागला असून, आता प्रचाराला प्रारंभ होणार आहे. निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी अथणी व कागवाड विधानसभा मतदारसंघांमध्ये विकासकामांच्या उद्घाटनाच्या स्पर्धा लागल्या होत्या. ग्रामीण भागात गेले अनेक वर्ष जेवढी कामे झाले नाहीत तेवढी कामे या काळात झाली आहेत. नेत्यांच्या स्पर्धेमुळे ग्रामीण भागात विकासकामांना वेग आला होता. आता विकासकामांच्या उद्घाटनांना ब्रेक लागला आहे. नेते व कार्यकत्यांना आता प्रचाराचे वेध लागले असून गावागावांत कट्ट्यांवर आता निवडणुकीच्या गप्पा रंगू लागल्या आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतरच कोण- कोणत्या पक्षाचा उमेदवार, हे समजणार आहे. ग्रामीण भागात हळूहळू राजकीय वातावरण तापत आहे. भाजपव काँग्रेसचा उमेदवार कोण ठरतो, यावरून निजद व आम आदमी, बसपचा उमेदवार ठरणार आहे. सर्व पक्षांत बंडखोरीचे चित्र दिसत आहे. त्यामुळे कोणाला मिळणार उमेदवारी याकडे कार्यकर्त्यांबरोबर नागरिकांचे लक्ष लागले आहे.
आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणूक आयोगाची करडी नजर चोहीकडे आहे. विविध ठिकाणी चेकपोस्ट उभारून अवैध वाहतुकीला आळा घालण्यात येत आहे. उमेदवाराच्या खर्चावरही मर्यादा घालण्यात आल्या असून आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रिंगणात उतरणाऱ्या नेत्यांची धावपळ सुरूातामू
विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्याने इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांची धावपळ सुरू आहे. उमेदवारी दाखल करण्यासाठी आवश्यक दाखले जमा करण्याबरोबर बँक कर्जाचा भरणा करण्यास प्रारंभ झाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी चांगला मुहूर्त कोणता, याबाबत चाचपणी करण्यात येत आहे. राष्ट्रीय पक्षांबरोबर इतर इच्छुक उमेदवारही शत्रू मारून निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. त्यामुळे वातावरण हळूहळू तापत आहेत. काही अपक्ष उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी धडपड करत आहेत.