बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : गोकाक तालुका तहसीलदारांच्या सरकारी बंगल्यात चोरी झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली. घरामध्ये कोणी नसल्याचे पाहून चोरट्यांनी डाव साधला आहे. चोरट्यांनी ऐवजासह रक्कम लंपास केली. घटना समजताच गोकाक शहर पोलिसांनी धाव घेऊन पाहणी केली.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या बंगल्यात वास्तव्यास असणाऱ्या तहसीलदार प्रकाश होळ्याप्पगोळ यांच्या घरामध्ये सदर चोरीची घटना घडली. २५० ग्रॅम सोन्याचे व १०० ग्रॅम चांदीचे दागिने लंपास करण्यात आले आहेत.
चोरट्यांनी कपाट व तिजोरीमध्ये ठेवण्यात आलेले साहित्य विस्कटून टाकले आहे. गोकाक पोलिसांनी श्वानपथकाच्या सहाय्याने तपास हाती घेतला आहे. ठसे तज्ज्ञांची मदत घेण्यात आली. घटनेची नोंद गोकाक पोलिसांत झाली आहे.
चोरीच्या घटनेची नोंद झाली असून संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली आहे. लवकरच पथकाची नियुक्ती करुन चोरट्यांना गजाआड करण्यात येईल.
-महानिंग नंदगावी, अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख