बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : कृषी खात्याचे संपूर्ण संगणकीकरण करण्यात आले आहे. सर्व माहिती संगणकावर उपलब्ध होणार असून १ एप्रिल २०२३ पासून सुरुवात होणार आहे. शेतकऱ्यांना सर्व माहिती ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होणार आहे.
सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सवलती, नवीन योजना, अनुदान आदी माहिती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. योजनांची माहिती राज्यभरातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेतकऱ्यांना सरकारकडून सवलतीच्या दरात बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशकांचा पुरवठा केला जातो. याची माहिती कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांकडून लपवण्यात येते. मात्र, यापुढे ही माहिती वेबसाईटवर नोंदवण्यात येणार आहे. परिणामी अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला लगाम बसणारा आहे.
अधिकाऱ्यांकडून बहुतांश वेळा बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशकांबाबत खोटी माहिती शेतकऱ्यांना देण्यात येते. परिणामी शेतकऱ्यांना बाजारातून खरेदी करावे लागते. ही सर्व माहिती यापुढे ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. यामुळे कृषी कार्यालयात उपलब्ध असणारा साठा शेतकऱ्यांना सहज कळणार आहे.
वेबसाईटवर बियाणे, खते, ', कीटकनाशके त्याचबरोबर गोदामातील साठा, विक्री वही, बैठकीचे कामकाज, पाटबंधारे खात्याकडून राबविण्यात येणाऱ्या योजनाही किसान अॅपवर उपलब्ध होणार आहे.
शेतकऱ्यांना सरकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेताना अर्जाबरोबर अनेक दाखले जोडावे लागतात. जात प्रमाणपत्र, सातबारा उतारा, आधार कार्ड आदी कागदांचा समावेश असतो. परंतु, यापुढे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना सुलभ ठरणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे.
कृषी खात्याचे कामकाज एप्रिलपासून ऑनलाईन पद्धतीने करण्याचा आदेश सरकारने बजावला आहे. राज्यात १७६ सहाय्यक कृषी संचालक कार्यालये, ५२ उपसंचालक कार्यालये, ३० सह कृषी संचालक कार्यालये, ७४२ रयत संपर्क केंद्रे, २३ जिल्हा कृषी प्रशिक्षण केंद्रे, १७ प्रयोगशाळा आहेत. याठिकाणी महिना कोट्यवधी रुपयांचा खर्च पेपरसाठी केला जातो. ही कार्यालये पेपरलेस होणार असल्याने खर्चाची बचत होणार आहे. वर्षभरात किमान २ कोटींची आर्थिक बचत होणार आहे.