औषधोपचाराच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक; बेनाडीतील प्रकार

औषधोपचाराच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक; बेनाडीतील प्रकार

बेनाडी : पुढारी वृत्तसेवा :  गेल्या नऊ-दहा दिवसांपासून कोल्हापूर येथील एनजीओ स्वयंसेवकांतर्फे कमी खर्चात गावात घरोघरी तपासणी करून रुग्णांना औषधोपचार देण्याच्या नावाखाली फसवणूक सुरू असल्याचे नागरिकांनी सांगितले. तपासणी केल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ५०० रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंत रकमेची मागणी करून मोठ्या प्रमाणात फसवणूक करत लूट केल्याची तक्रार नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे केली आहे.

बेनाडीमध्ये आठवड्यापासून स्माईल हेल्थकेअर फाऊंडेशनच्या (उचगाव-कोल्हापूर) नावे कार्यरत असलेल्या एनजीओमधील स्वयंसेवकांनी एक लेटर पॅड तयार करून त्यावर ग्रा. पं. अध्यक्षा सुषमा भोरे यांची सही घेत गावात तपासणी केली. दोन महिलांच्या सहाय्याने सुरुवातीला घरोघरी फिरून कोण रुग्ण आहे का, अशी विचारणा करत रक्तदाब, मधुमेह, अंगदुखी, पाठदुखी, गुडघेदखी, डोकेदुखी, पोटाचे आजार असल्यास स्वस्तामध्ये आयुर्वेदिक उपचार करत असल्याचे सांगितले.

सुरुवातीस नाव नोंदणीसाठी १० रुपये घेऊन त्यांच्या नावे पावती दिली. त्यानंतर दुसरी टीम येऊन पावती केलेल्या रुग्णांच्या घरी जाऊन स्कॅनिंग मशीनद्वारे तपासणी केल्याचे सांगत विविध आजाराची भीती घातली. उपचारासाठी ५०० रुपयांपासून २२०० रुपयापर्यंत रक्कम घेऊन आयुर्वेदिक औषध असल्याचे सांगून त्यांना सदर औषधे दिली. अशाप्रकारे मोठ्याप्रमाणात रकमेची लूट करण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

याबाबत जनता कॉलनीतील काही सुज्ञ नागरिकांनी ग्रामपंचायतकडे तक्रार केल्यानंतर ग्रा.पं. सचिव शिवानंद होसमणी यांनी तातडीने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नाव नोंदणी घेत असलेल्या महिलांकडून माहिती जाणून घेतली. या टीममधील महिलांनी आपल्या टीमचे प्रमुख निपाणीतील डॉक्टर असून त्यांनी आयुर्वेदिक क्षेत्रातील एमडी पदवी घेतली असल्याचे सांगितले. शिवाय आम्ही केवळ नाव नोंदणी करून १० रुपये घेत असून रुग्ण तपासणी आणि औषधे देण्यासाठी दुसरी टीम येत असल्याचे सांगितले.

यावेळी नागरिकांनी आमच्याकडून मोठी रक्कम घेतल्याचे सांगितले. संबंधित टीमला ग्रामपंचायतीकडे येण्यास होसमणी यांनी सांगितले. पण सदर टीम ग्रामपंचायतीला गेली नाही. त्यामुळे आठवड्याभरापासून गावातील नागरिकांची आयुर्वेदिक औषधे पुरविण्याच्या नावाखाली लूट होत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

बेनाडी गावामध्ये सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्ज इमारत आणि तज्ज्ञ अनुभवी वैद्याधिकारी, सहाय्यक कर्मचारी आहेत. रुग्णांना ते तत्परतेने सेवा देत असताना अशा फसवणूक करणाऱ्या लोकांकडूनही पैशाची लूट झाल्याचे सांगण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एका वेगळ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून आशा कार्यकर्त्यांच्या मदतीने गावात वेळोवेळी तपासणीही केली जाते. तरीही असे प्रकार घडत असल्याने चर्चेचा विषय बनला आहे.

बेनाडीमध्ये घडत असलेला हा प्रकार केवळ पैसे काढण्यासाठी सुरू आहे. सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रक्तदाब, मधुमेह व अन्य आजाराची तपासणी मोफत केली जाते.. सध्या गावात एनजीओकडून सुरू असलेल्या तपासणीसाठी आरोग्य खात्याच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून परवानगी घेणे आवश्यक आहे.

– डॉ. ए. एस. मुजावर, वैद्याधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, बेनाडी.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news