

निपाणी : सुसंस्कृत आणि ऐतिहासिक म्हणून ओळखल्या जाणारे निपाणी शहर हे कर्नाटक-महाराष्ट्र सीमारेषेवर वसलेले, शैक्षणिक, व्यापारी व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र आहे. शाळा, महाविद्यालये, छोटे-मोठे उद्योग, व्यापारी आस्थापने यामुळे हे शहर सदैव गजबजलेले असते. परंतु गेल्या काही वर्षांत या शहरातील युवक तसेच छोटे-मोठे व्यापारी, कामगार अगदी काही गृहिणीदेखील ऑनलाईन गेमिंग आहारी गेल्या आहेत.
गेम खेळणे ही गोष्ट मुलांपुरतीच राहिली नाही ती आता तरुणाईच्या रोजच्या जीवनशैलीत पक्की रुतून बसली आहे. काहीजण वेळ घालवण्यासाठी तर काहीजण झटपट पैसे मिळवण्याची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी ऑनलाईन गेमिंगच्या आहारी जात आहेत.
निपाणी भागातही ऑनलाईन गेमिंगचे अॅप्स आणि प्लॅटफॉर्म्स झपाट्याने लोकप्रिय होऊ लागले. सुरुवातीला हे फक्त मनोरंजनासाठी वापरले जात होते परंतु जसजसे पेड गेम्स, फॅन्टसी स्पोर्टस्, ऑनलाइन कार्ड गेम्स, सट्टेबाजी प्लॅटफॉर्म्स यांचा प्रसार झाला, तसतसे त्याचे गंभीर दुष्परिणाम समाजावर दिसू लागले.
बरेच विद्यार्थी अभ्यासाऐवजी मोबाईलवर गेम खेळण्यात वेळ घालवतात. केवळ एक रुपयामध्ये गेम जिंकल्यावर पाचशे ते 5 हजार रुपये मिळतात. एक गेम जिंकलो तर 500 रुपये, पुन्हा एकदा खेळलो तर 1000 रुपये अशी लालसा त्यांना खेचते. केंद्र सरकारने विविध ऑनलाईन गेम अॅपवर बंदी घातली असली तरी गुगल किंवा व्हाट्सअप, टेलिग्राम व इंस्टाग्रामच्या माध्यमातून ऑनलाईन गेमिंगच्या लिंक मिळतात. पैसे गमावल्याने अनेकजण कर्जबाजारी होत असून, व्यसनाधीनतेच्या मार्गाला लागले आहेत. यातूनच आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत आहे.
पोलिसांचे दुर्लक्ष
एकीकडे ऑनलाईन जुगाराने थैमान घातले असताना, दुसरीकडे शहराजवळ पारंपरिक जुगाराचे अड्डेही राजरोसपणे सुरू आहेत. शहराच्या सीमेवर हे अड्डे चालत असले तरी आपल्या हद्दीत येत नाही म्हणून पोलिस त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. या गंभीर प्रकाराकडे वेळीच लक्ष न दिल्यास तरुण पिढीचे भविष्य अंधारात जाईल, अशी भीती व्यक्त होत असून, पोलिसांनी यावर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.