

बेळगाव : पूर्ववैमनस्यातून एकावर तलवार हल्ला झाल्याची घटना शनिवार, दि. 14 रोजी रात्री उशिरा सुभाषनगर येथे घडली. मार्केट पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. या घटनेत जखमी झालेल्या युवकाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अफजल अमजद देसाई (वय 30, रा. कसाई गल्ली, बेळगाव) असे जखमीचे नाव आहे.
याप्रकरणी हुजेर खालिद मनियार ऊर्फ बाबू टायर (वय 24, रा. उज्ज्वल नगर), शाहीद ऊर्फ खाला हारून हबीब (वय 27, रा. वीरभद्रनगर), दानिश युसुफ चांदवले (वय 26, रा. जालगार गल्ली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गेल्यावर्षी रमजान सणादरम्यान अफजल आणि हुजेर यांच्यात वादावादी झाली होती. त्या रागातून हा हल्ला झाला आहे. अफजल हा फॅब्रिकेटरचे काम करतो तसेच रिक्षाही चालवतो.
शनिवारी तो काम संपवून सुभाषनगर येथे आपल्या नातेवाईकांच्या घरी जात होता. सुभाषनगर येथील डबल रोडजवळ अडवून शाहीद, दानिश आणि हुजेर याने त्याच्यावर तलवारीने हल्ला केला. यात अफजलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमी अफजलला रुग्णालयाकडे हलविले. मार्केट पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून तिघांना अटक केली आहे. या प्रकरणात फिर्यादी फैयाज फारूक चौधरी (रा. सुभाषनगर) यांनाही किरकोळ मारहाण करण्यात आली आहे.
मध्यस्थीसाठी प्रयत्न, तरीदेखील हल्ला
गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यामध्ये हा वाद सुरूच होता. हा वाद मिटवण्याचा प्रयत्न सुरू होते. मात्र शनिवारी आपला मुलगा अफजल याच्यावर हल्ला करण्यात आल्याचे जखमीचे वडील अमजद देसाई यांनी सांगितले. आमच्या मुलाच्या जीवाला धोका असून चारजणांनी हा हल्ला केला आहे. त्यामुळे पोलिसांनी आम्हाला संरक्षण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.