

बेळगाव : गवंडी काम करणारे दोघेही सख्खे भाऊ नेहमीच भांडत. परंतु, बुधवारी दोघांमधील भांडणात एकाचा बळी गेला. धाकट्याने आईकडे जेवण मागत शिवीगाळ केली. त्यावर थोरल्याने, ‘थांब तुला मीच जेवण देतो’, असे म्हणत बाजूचा लोखंडी रॉड उचलला आणि भावाच्या डोक्यात घातला. तसेच खुरप्याने हल्ला केल्याने धाकटा भाऊ जागीच ठार झाला. बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास धामणे एस. (ता. बेळगाव) येथे ही घटना घडली.
लक्ष्मण ऊर्फ प्रशांत भरमा बाळेकुंद्री (वय 28) असे मृताचे नाव आहे. मारुती भरमा बाळेकुंद्री (वय 30, दोघेही रा. बसवाण गल्ली, धामणे) असे खुनी भावाचे नाव आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, लक्ष्मण व मारुती हे दोघेजण गवंडी काम करत होते. घरी आई असते; पण तिला अंधत्व आलेले आहे. दोघाही भावांना दारूचे व्यसन असल्याने व घरात सतत भांडत करत असल्याने दोघांचेही लग्न झालेले नाही.
बुधवारी दुपारी बाहेर गेलेला लक्ष्मण मद्य पिऊन घरी आला. आल्या आल्या त्याने आईशी भांडण काढले. मला जेवण वाढ, असे म्हणत तो आईला शिवीगाळ करू लागला. यावेळी मारुती घरीच होता. त्यानेही मद्यप्राशन केले होते. आईला शिव्या का देतोस, असे म्हणत त्याने वाद घातला. त्यानंतर थांब तुला मीच जेवण देतो, असे म्हणत मारुतीने बाजूलाच असलेला लोखंडी रॉड घेऊन तो लक्ष्मणच्या डोक्यात घातला. यानंतरही त्याला राग अनावर झाल्याने बाजूला पडलेले खुरपे घेऊन लक्ष्मणवर सपासप वार केले. आधीच मद्याच्या आधीन असलेल्या लक्ष्मणला स्वतःला सावरता आले नाही. हल्ल्यानंतर त्याचा तोल जाऊन बाजूलाच असलेल्या कट्ट्यावर डोके आदळल्याने तो जागीच मृत पावला.
घटनेची माहिती मिळताच वडगावचे पोलीस उपनिरीक्षक लक्काप्पा जोडट्टी व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी रोहन जगदीश यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. हल्ल्यानंतर मारुती तेथेच बसून होता. त्याला ताब्यात घेऊन वडगाव ठाण्यात आणले. रात्री उशिरापर्यंत त्याच्या अटकेची प्रक्रिया सुरू होती.