Railway Accident | हेडफोन, रील्सने युवकाचा बळी

बेळगावात रेल्वेखाली सापडून ठार : तानाजी गल्ली रुळावर दुर्घटना; पायलटच्या हॉर्नकडे दुर्लक्ष
Railway Accident |
Railway Accident | हेडफोन, रील्सने युवकाचा बळी
Published on
Updated on

बेळगाव : हेडफोन घालून रील बघत आणि गाणी ऐकत आपल्याच धुंदीत रेल्वे रुळांच्या मधोमध चालत निघालेल्या तरुणाचा बळी गेला आहे. लोको पायलटने सातत्याने हॉर्न वाजवूनही तो ऐकू न गेल्याने हा तरुण रेल्वेच्या धडकेत ठार झाला. सोमवारी दुपारी एकच्या सुमारास तानाजी गल्ली रेल्वे रुळाजवळ ही घटना घडली. रोहित रमेश पाटील (वय १७, रा. मरगाई गल्ली, कोंडसकोप्प) असे मृत युवकाचे नाव आहे.

रेल्वे पोलिसांनी दिलेली व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, रोहित हा शहापूर येथील चिंतामणराव कॉलेजमध्ये अकरावीत शिकत होता. आज त्याची परीक्षा होती. ती संपवून तो गावी कोंडसकोप्पला बसने जाण्यासाठी नेहमीचा रेल्वे रुळाचा रस्ता निवडला. धारवाड रेल्वे गेटपासून तो तानाजी गल्ली रेल्वे रूळमार्गे चालत सीबीटीकडे निघाला होता. यावेळी त्याने आपल्या स्मार्ट फोनवर रील उघडले होते, तसेच दोन्ही कानांमध्ये हेडफोन घालून तो निवांत रूळाच्या मधून चालत निघाला होता.

पोलिसांकडून पंचनामा

घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिस उपनिरीक्षक सत्याप्पा मुक्कन्नवर, कॉन्स्टेबल गोपाळ चव्हाण, हणमंत विभुते आदी घटनास्थळी दाखल झाले. स्टेशन मास्तर द्विजेंद्र कुमार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रेल्वे पोलिसांत नोंद झाली आहे.

सामाजिक कार्यकर्त्यांची मदत

दुर्घटनेनंतर अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद हुली, शशिकांत आंबेडवाडकर, विकी मेहता, माकयल पिन्टो, शुभम हुली या सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत रेल्वे पोलिसांना मदत केली.

रूळावर बॅग अन् बाजूला हेडफोन

लोको पायलटने समोरून निघालेला युवक वाचावा, यासाठी अटोकाट प्रयत्न केला. परंतु, दोन्ही कानांमध्ये हेडफोन असल्याने रोहितने हॉर्न ऐकलाच नाही. तरीही रेल्वेचा करकचून ब्रेक लावून चालत नाही. त्यामुळे चालकाने आवश्यक तितका ब्रेक मारून रेल्वे थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु, रेल्वेचा किंचितसा धक्का बसला अन् रोहित जागीच ठार झाला. त्याच्या कानाच्या बाजूलाच हेडफोन व रूळावर काॅलेजची बॅग पडली होती.

हॉर्न वाजवला, पण...

रोहित ज्या ट्रॅकवरून निघाला होता त्याच ट्रॅकवरून त्याच्या पाठीमागून मिरज-बेळगावला पॅसेंजर येत होती. लोको पायलटला समोर रेल्वे रूळावरून कोणीतरी चालत निघाल्याचे सुमारे ८० ते १०० मीटरवरून दिसले. त्यामुळे त्याने सातत्याने हॉर्न वाजवला. परंतु, दोन्ही कानात इअरफोन असल्याने रोहितला आवाजच ऐकू गेला नाही. चालकाने इतक्या वेळा हॉर्न वाजवला की आजूबाजूचे लोकही हॉर्न इतक्या वेळा का वाजतो आहे, हे बघण्यासाठी बाहेर आले. त्यांनीही रोहितला ओरडून बाजूला होण्यास सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, कोणाकडेच त्याचे लक्ष गेले नाही. शेवटी चालकाने रेल्वेचा ब्रेक लावला. तरीही रेल्वेची त्याच्या डोक्याला धडक बसली आणि तो जागीच ठार झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news