

बेळगाव : सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित -असलेल्या खटल्याची सुनावणी जलदगतीने करावी, या मागणीसाठी बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि सीमाभागातील मराठी भाषिकांतर्फे सह्यांची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या उपक्रमला येळ्ळूर विभाग म. ए. समितीने पाठिंबा दिला असून गावात सह्या संकलनाला प्रारंभ केला आहे.
दीर्घकाल प्रलंबित असलेला महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न 2004 मध्ये सर्वोच्च न्यायालयात दाखल केला. आज 22 वर्षे झाली तरी या खटल्यावर सुनावणी होऊ शकलेली नाही. सदर सुनावणी तत्काळ आणि जलदगतीने करावी, अशी विनंती बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि सीमाभागातील मराठी भाषिकांतर्फे एक लाख सह्यांचे निवेदन सरन्यायाधीशाना सादर करण्यात येणार आहे. या महत्त्वपूर्ण उपक्रमाला पाठिंबा देऊन येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीने येळ्ळूरमध्ये मोहिमेला प्रारंभ केला.
प्रकाश अष्टेकर यांनी या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. आजी-माजी जिल्हा पंचायत सदस्य, तालुका पंचायत सदस्य, ग्राम पंचायत सदस्य, विविध सहकारी पतसंस्थाचे प्रतिनिधी, युवक संघटनांचे प्रमुख, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि मराठी भाषिकांच्या भेटी घेऊन सदर मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन त्यांनी केले. इतरांनीही मार्गदर्शन केले.
या मोहिमेत माजी एपीएमसी सदस्य वामन पाटील, राजू पावले, शिवाजी सायनेकर, वामन पाटील, दत्ता उघाडे, दुधाप्पा बागेवाडी, सतीश देसुरकर, बंडू मजुकर, कृष्णा शहापूरकर, प्रकाश मालुचे, सूरज गोरल, दयानंद उघाडे, राकेश परीट, नंदकुमार पाटील, नेताजी गोरल, यल्लूप्पा पाटील, बाळू पाटील, गणपत हट्टीकर, कृष्णा बिजगरकर, चंद्रकांत पाटील, आपाजी पुजारी, मनोहर पाटील, महावीर पुजारी बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.