

अंकली : भारत-पाक युद्धामध्ये भारतीय सैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी व संपूर्ण दहशतवाद नष्ट करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेऊन लढणार्या भारतीय सैनिकांचे मनोधैर्य वाढवण्यासह युद्धात विजय मिळण्यासाठी येडूर येथील वीरभद्र देवस्थानमध्ये विशेष पूजा व होमवहन करण्यात आले.
श्रीशैल पिठाचे जगद्गुरू डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामींच्या नेतृत्वाखाली काडसिद्धेश्वर संस्थान मठातर्फे वेद व संस्कृत पाठशाळेच्या सुमारे 200 विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पाठशाळेचे शिक्षक श्रीशैल शास्त्री गुरुजी, बसवराज शास्त्री गुरुजी व देवस्थानाचे पुजारी यांच्या उपस्थितीत पूजा करण्यात आली.
वेद व संस्कृत पाठशाळेचे प्रमुख शैलशास्त्री गुरुजी म्हणाले, भारतीय सैन्यदलाने ऑपरेशन सिंदूर या नावाने सुरू केलेली कारवाई अत्यंत महत्त्वाची आहे. त्यासाठी भारतीय सैनिकाला आत्मधैर्य मिळण्यासाठी विशेष पूजा व होमवहनचे आयोजन करण्यात आले आहे. देशाच्या संरक्षणासाठी आपले प्राण पणाला लावून लढणार्या प्रत्येक सैनिकाला यश मिळण्यासाठी विशेष प्रार्थनाही करण्यात आली.
यावेळी अडवय्या अरळीकट्टीमठ, दीपक कमते, मुत्तू मठद, नरसगौडा कमते, मनोहर फुटाणे, सिद्धया मठपती, नवीन मठपती, शिवानंद हिरेमठ यांच्यासह वेद व संस्कृत पाठशाळेचे सुमारे 200 विद्यार्थी उपस्थित होते.