World Women's Day : निपाणी तालुक्यावर महिलाराज

World Women's Day
Pudhari File Photo
Published on
Updated on
मधुकर पाटील, निपाणी

आज विविध क्षेत्रांत महिला आघाडीवर दिसून येत आहेत. निपाणी तालुक्यावर तर महिलांचाच वरचष्मा दिसून येत आहे. न्यायाधीश, पोलिस, शिक्षण, वैद्यकीय, टाऊन प्लॅनिंग, महिला बालकल्याण अशा सर्वच क्षेत्रांत महिला अधिकारी आहेत. तसेच खासदार, आमदार व नगराध्यक्षाही महिलाच आहेत. शहरातील माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण संस्थांपैकी 12 शिक्षण संस्थांमध्ये प्राचार्या व मुख्याध्यापक पदावरही महिला कार्यरत आहेत.

न्यायदान विभाग

येथील न्यायालयातील तीनही पदावर महिलाच कार्यरत आहेत. न्या. बेनिकल सुमलता या वरिष्ठस्तर न्यायाधीश असून त्या 2016 पासून आपले कर्तव्य बजावत आहेत. हुबळी येथील जी. के. लॉ कॉलेज येथे त्यांनी शिक्षण घेतले असून कुवेंपू विद्यापीठ शिमोगा येथे त्यांचे उच्च शिक्षण झाले आहे. न्या.रंजीता एस. के. या कनिष्ठस्तर न्यायाधीश असून त्यांचे कायद्याचे शिक्षण धारवाड येथे झाले आहे. नॅशनल लॉ विद्यापीठ रायपूर, छत्तीसगड येथे त्यांचे शिक्षण झाले आहे. अतिरिक्त न्या. सुनीता प्रभण्णावर या 2023 पासून येथे कार्यरत आहेत. त्यांनी हुबळी विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे.

पोलिस विभाग

शहर पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक उमादेवी गौडा या बंगळूरच्या रहिवासी असून त्या गेल्या 13 वर्षापासून पोलिस खात्यात सेवेत आहेत. दोन वर्षापासून त्या निपाणीत कार्यरत आहेत. महिला पुरुषांपेक्षा अधिक जबाबदारीने काम करू शकतात, हे त्यांनी कृतीतून दाखवले आहे. खडकलाट पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक अनिता राठोड या मूळच्या विजापूरच्या रहिवासी असून त्या दोन वर्षांपासून निपाणी पोलिस सर्कलमध्ये कार्यरत आहेत. त्यांना निपाणी सर्कलमध्ये दुसर्‍यांदा पोलीस उपनिरीक्षक म्हणून संधी मिळाली आहे.

शिक्षण विभाग

तालुका गटशिक्षणाधिकारी (बीईओ) म्हणून महादेवी नाईक कार्यरत असून त्या बेनाडीच्या रहिवासी आहेत. त्यांचे शिक्षण एमएबीएड असून त्या केईएस अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी डीडीपीआय कार्यालय धारवाड येथे विषय अधिकारी तर बीएड कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून सेवा बजावली आहे.

वैद्यकीय विभाग

सरकारी महात्मा गांधी रुग्णालयाच्या मुख्य वैद्याधिकारी म्हणून डॉ. सीमा गुंजाळ कार्यरत आहेत. त्यांचे शिक्षण एमबीबीएस (प्रसूतीतज्ज्ञ) झाले असून त्या गेल्या दहा वर्षापासून येथे कार्यरत आहेत. त्या रुजू झाल्या त्यावेळी सरकारी या रुग्णालयात महिन्याला 5 ते 7 महिलांची प्रसूती होत होती. आज तो आकडा 100 ते 150 च्या दरम्यान गेला आहे. राज्य व राष्ट्रीय पातळीवरील रुग्णालय तपासणीमध्ये 100 पैकी 97 गुण या रुग्णालयाला मिळाले आहेत.

प्रशासन विभाग

महिला व बालकल्याण अधिकारी म्हणून सुप्रिया जडगे या पाच वर्षांपासून सेवेत आहेत. दोन वर्षांपूर्वी त्या येथे रुजू झाल्या आहेत. महिलांसाठीअनेक सवलती व योजना अंगणवाडी सेविकांमार्फत तालुक्यातील प्रत्येक घरात पोहोचविण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. कोणतेही काम करताना महिलांनी धाडसाने पुढे येणे गरजेचे आहे. शिवाय आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, असे त्या सांगतात.

एखाद्या शहराचे प्लॅनिंग करताना किमान पुढील 50 वर्षांचा विचार होणे आवश्यक असते. हे महत्त्वाचे काम बेळगाव येथील विजयालक्ष्मी बाळेहोसूर पार पाडत आहेत. येथील टाऊन प्लॅनिंगच्या (नगरविकास प्राधिकरण कार्यालय) कार्यकारी अधिकारी म्हणून त्या सेवा बजावत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून त्या निपाणी येथे काम करत आहेत. महिलांनी आत्मसन्मान जोपासल्यास त्या कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात असा त्यांचा दृढ विश्वास आहे.

खासदार, आमदार, नगराध्यक्षपदी महिलाच

निपाणी तालुक्याचे वैशिष्ट्य म्हणजे तालुक्याच्या आमदार, खासदार आणि नगराध्यक्षाही महिलाच आहेत. आमदार शशिकला जोल्ले, खासदार प्रियांका जारकीहोळी व नगराध्यक्षा सोनल कोठडीया आपले कर्तव्य बजावत आहेत. या तीनही महिला लोकप्रतिनिधींनी आपापल्या कार्यक्षेत्रात वरचष्मा राखला आहे. विविध विकासकामांच्या माध्यमातून त्यांनी नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर भर दिला आहे. महिला लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे.

प्राचार्या, मुख्याध्यापकपदीही महिला

देवचंद कॉलेज प्राचार्यापदी डॉ. जी. डी. इंगळे, बागेवाडी पी. यु. कॉलेज प्राचार्यापदी एच. डी. चिकमठ, मॉडर्न इंग्लिश स्कूल प्राचार्या म्हणून स्नेहा घाटगे, गोमटेश इंग्लिश स्कूल ज्योती हरदी, अंकुरम इंग्लिश स्कूल चेतना चौगुले, व्हीएसएम सीबीएसी स्कूल डॉ. समीरा बागेवाडी, केएलई सीबीएससी स्कूल आशा मार्टिन तर यु. के. पब्लिक इंग्लिश मीडियम स्कूल प्राचार्यापदी समिना काझी कार्यरत आहेत. मोहनलाल दोशी विद्यालय मुख्याध्यापिकापदी एस. एम. गोडबोले, भागीरथीबाई कन्या शाळा डॉ. स्नेहल पाटील, म्युनिसिपल हायस्कूल रवीकुमारी चव्हाण तर सीएमसी इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका म्हणून अश्विनी बेल्लद कार्यरत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news