बेळगाव : विधानसभा व लोकसभेत महिलांना 50 टक्के वाटा मिळेल तेव्हा मिळेल; पण मतदान प्रक्रियेत कर्नाटकातील महिलांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्याला कारणही तितकेच महत्त्वाचे आहे. राज्यात आता महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक झाली आहे. राज्याच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले आहे. राज्याच्या मुख्य निवडणूक कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीनुसार ही आकडेवारी पुढे आली आहे.
निवडणूक विभागाच्या प्राथमिक आकडेवारीनुसार राज्यातील 221 विधानसभा मतदारसंघातील महिला मतदारांची संख्या 2.72 कोटींवर पोहोेचली आहे. तर पुरुष मतदारांची संख्या 2.71 कोटी आहे. तर 5,022 मतदार तृतीयपंथी आहेत. चन्नपट्टण, शिग्गाव व सांडूरमध्ये 13 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होत असल्याने या यादीत वरील तीन मतदारसंघातील मतदारांचा समावेश केलेला नाही. या तीन मतदारसंघांतील मतदार संख्या यादीत समाविष्ट केली तरी महिलांची संख्या पुरुषांपेक्षा 36,642 ने अधिक आहे. सध्या तरी किनारपट्टीसह काही जिल्ह्यांमध्ये महिला मतदारांची संख्या लक्षणीयरित्या अधिक आहे. मतदारांना 28 नोव्हेंबरपर्यंत या यादीवर आक्षेप नोंदविता येणार आहेत. तर अंतिम यादी 6 जानेवारी 2025 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
महिलांच्या या वाढलेल्या संख्येला निवडणुकीच्या राजकारणात महत्त्व आले आहे. या संख्येमुळे राजकीय समीकरणे बदलू शकत असल्याने पक्षांना आपल्या धोरणात बदल करणे अनिवार्य आहे. महिला मतदारांच्या वाढलेल्या संख्येमुळे राज्यातील राजकीय पटलावर लागलीच बदल होणार नाहीत. पण, त्याचे दूरगामी परिणाम शक्य आहेत. याआधीच्या निवडणुकांमध्ये काही मतदारसंघात महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक असल्याचे आढळून आले आहे. निवडणूक प्रक्रियेतील महिलांचा वाढता सहभाग नवा नाही. पण, रोजगारासाठी पुरुषांचे राज्याबाहेर स्थलांतर वाढल्याने हा बदल झाला असावा, असे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मतदारांची एकूण संख्या : 5,43,96,974
पुरुष मतदार : 2,71,79,483
महिला मतदार : 2,72,12,469
तृतीयपंथी मतदार : 5,022
तरुण मतदार (18-19 वर्षे) : 15,14,584
ज्येष्ठ नागरिक (85 पेक्षा अधिक) : 5,40,114
सर्वात मोठा मतदारसंघ : बंगळूर दक्षिण (7,64,895)
सर्वात लहान मतदारसंघ : श्रृंगेरी (1,68,653)