बराक ओबामा बेळगावात येणार?

काँग्रेस अधिवेशन शताब्दीसाठी सरकारकडून आमंत्रण
Barack Obama In Belgaon
बराक ओबामा बेळगावात येणार?Pudhari Photo
Published on
Updated on

बेळगाव ः पुढारी वृत्तसेवा

बेळगावात झालेल्या काँग्रेस अधिवेशनाला यंदा डिसेंबरमध्ये शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी अध्यक्षपद भूषविलेले ते एकमेव अधिवेशन असल्याने त्याला महत्त्व आहे. त्यामुळे या अधिवेशनाचा शताब्दी सोहळा भव्य पद्धतीने साजरा करण्याचा निश्चय राज्य सरकारसह प्रदेश काँग्रेसने केला आहे. हा सोहळा अविस्मरणीय करण्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना आमंत्रित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसे झाल्यास हा सोहळा ऐतिहासिक ठरणार आहे.

लहानपणी ऐकल्या होत्या रामायण, महाभारताच्या कथा : बराक ओबामा

बंगळुरात बुधवारी (दि. 2) झालेल्या महात्मा गांधी जयंती कार्यक्रमावेळी राज्याचे कायदा व संसदीय व्यवहारमंत्री एच. के. पाटील यांनी याबाबतची घोषणा केली. बेळगावात डिसेंबरमध्ये होणारा काँग्रेस अधिवेशनाचा शताब्दी सोहळा संस्मरणीय, अर्थपूर्ण व प्रभावी केला जाईल. या सोहळ्यात गांधीजींची महानता सर्वांसमोर आणण्यावर भर दिला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी यंदाच्या स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात केली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील संयोजन समिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या सहकार्याने बराक ओबामा यांना शताब्दी सोहळ्यासाठी 24, 25, व 26 डिसेंबर रोजी प्रमुख वक्ते म्हणून बेळगावात आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ओबामा गांधीजींचे विचार मानणारे जागतिक नेते आहेत. त्यांनी नेहमीच गांधी विचारांचा अनुनय केला आहे. जगातील एक महान नेते म्हणून त्यांनी गांधीजींचा नेहमीच पुरस्कार केला आहे. गांधीजींचा वारसा चालविणार्‍या या नेत्याला पाचारण करुन गांधी विचारांबाबत जागृती निर्माण करणे व त्यांची महानता कमी करण्याचा प्रयत्न करणार्‍यांशी लढा देणे हा ओबामा यांनी प्रमुख अतिथी म्हणून निवडण्यामागचा प्रमुख उद्देश असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.

'त्या' मुलांसाठी ओबामा बनले सांता!(Video)

प्रशासनासह काँग्रेसकडूनही तयारी

काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी सोहळ्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासन सोहळ्याची तयारी करत आहे. त्यासाठी पूर्वतयारी बैठकाही झाल्या असून, कार्यक्रमांची रुपरेषा आखली जात आहे. राज्य सरकारबरोबरच काँग्रेस पक्षही स्वतंत्रपणे विविध उपक्रमांनी हा सोहळा साजरा करणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news