

Chaaloba elephant on Belgaum Chandgad border
बेळगाव : कोल्हापूर जिल्हा वनक्षेत्रातील आजरा येथील चाळोबा जंगलातून २० एप्रिलला बेळगाव व चंदगड तालुक्याच्या सीमाभागात आगमन केलेल्या चाळोबा गणेश हत्तीने गत १६ दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. रविवारी (दि. ४ ) सायंकाळी ६ वाजता अतिवाड फाटा येथील एका हॉटेलवर हत्तीने हल्ला केला. यावेळी हॉटेलच्या पाठीमागील खोलीत ठेवलेले डी फ्रिज सोंडीने बाहेर ओढून फोडून टाकले. तसेच शेजारी असलेली पाण्याची प्लास्टिक टाकीही फोडून टाकली. हॉटेल चालक संजय गावडे यांना सुमारे ५० हजार रुपयांचा फटका बसला आहे.
वर्षभरानंतर चाळोबा गणेश हत्ती पुन्हा बेळगाव तालुक्याच्या सीमाभागात आला असून तो आता दिवसेंदिवस अधिक आक्रमक होऊ लागला आहे. काही दिवसांपूर्वी हत्ती केवळ रात्री जंगलाबाहेर पडून नुकसान करत असे. मात्र, आता तो दिवसाही बाहेर पडू लागल्याने शेतकरी धास्तावले आहेत. त्यातच उचगाव - कोवाड रस्त्यावर भर दिवसा हत्ती येत असल्याने प्रवाशांच्या जीवालाही मोठा धोका निर्माण झाला आहे. वनखात्याने या परिसरात चोवीस तास गस्त ठेवावी, अशी मागणी होत आहे.
उचगाव - कोवाड या रस्त्यावर अतिवाड फाटा येथे तीन हॉटेल्स आहेत. यापैकी मध्यभागी लोटस हे हॉटेल बेकिनकेरे येथील संजय गावडे चालवतात. या हॉटेलमध्ये पाठीमागील बाजूच्या खोलीत डी फ्रीज ठेवले होते. सदर डी फ्रीज या हत्तीने सोंडीने बाहेर ओढून घेऊन फोडून टाकले. त्यानंतर शेजारी असलेली पाण्याची टाकी ही फोडून १०० मीटर अंतरावर नेऊन त्या टाकीचा चंदामेंदा करून टाकला.
या दरम्यान, संजय गावडे हॉटेलच्या समोर बाहेरील बाजूला झाडलोट करत होते. तर हॉटेलमध्ये २ कर्मचारी काम करत होते. मात्र, हळुवारपणे येऊन सदर हत्तीने हल्ला चढवला. काही वेळानंतर हत्ती आल्याचे समजले, यानंतर त्या हत्तीला हूसकावून लावले. परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आठ दिवसांपूर्वी दर्शन पाटील यांच्या शेतातील घराचे प्रवेशद्वार मोडून कंपाऊंडमध्ये प्रवेश करून या हत्तीने नुकसान केले आहे. तसेच संदीप भोगण यांच्या घराजवळील दुचाकीचेही नुकसान केले आहे.
चाळोबा गणेश हत्तीने गत पंधरा दिवसांपासून बेकिनकेरे व अतिवाड फाटा जवळील शिवारात धुमाकूळ घातला आहे. हत्ती भर दिवसा लोकवस्तीमध्ये येत असल्याने लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. वन खात्याने हत्तीचा बंदोबस्त करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू. शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास वनखाते जबाबदार राहील.
- सुनील गावडे, सामाजिक कार्यकर्ते, बेकिनकेरे