Wife Murder Case | विष पाजून गळा आवळत पत्नीचा खून; अनैतिक संबंध लपविण्यासाठी कृत्य

अपघात भासवणारा पती अटकेत
शिल्तीभावी : येथे पत्नीचा खून करून तिच्या अंगावर दुचाकी टाकत अपघात भासवण्याचा प्रयत्न करणारा संतोष बाजूला झोपलेला दिसत आहे.
शिल्तीभावी : येथे पत्नीचा खून करून तिच्या अंगावर दुचाकी टाकत अपघात भासवण्याचा प्रयत्न करणारा संतोष बाजूला झोपलेला दिसत आहे.
Published on
Updated on

बेळगाव : मंदिराला नेऊन रात्री घरी परतताना पत्नीला जिरा सोडामधून विष पाजले. त्यानंतर तिचा गळा आवळून खून केला. आपल्याला दुसरी गाडी धडकून गेली हे भासवण्यासाठी पत्नीच्या अंगावरून मागे-पुढे दोनवेळा दुचाकी घातली. परंतु, गोकाक ग्रामीण पोलिसांनी चाणाक्षपणे या खुनाचा छडा लावत पतीला जेरबंद केले.

संतोष रेवण्णा पटायत (वय ३३, रा. शिंदीकुरबेट, ता. गोकाक) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याने पत्नी सखुबाई संतोष पटायत (३२, रा. शिंदीकुरबेट) हिचा खून केल्याची घटना शुक्रवारी (दि. १२) उघडकीस आली. याबाबतची माहिती जिल्हा पोलिसप्रमुख के. रामराजन यांनी सोमवारी (दि. १५) पत्रकार परिषदेत दिली.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, संतोष याचे गेल्या चार वर्षांपासून एका महिलेसोबत अनैतिक संबंध आहेत. याची माहिती पत्नी सखुबाईला मिळाल्यानंतर ती पतीशी सातत्याने भांडण काढत होती. तिने ही माहिती आपल्या माहेरीही कळविली होती. परंतु, त्याच्यात काहीही सुधारणा होत नव्हती.

पत्नी सातत्याने भांडण काढत असल्याने संतोष वैतागला होता. त्याने पत्नीचा काटा काढण्याचा डाव रचला. दोन दिवसांपूर्वी त्याने मुरकुंबीतील चामुंडेश्वरी मंदिराला जाऊन येऊ, असे सांगत पत्नीला दुचाकीवरून नेले. रात्री नऊच्या सुमारास येताना मुरगोडला थांबून त्याने जिरा सोडाची बाटली घेतली. काही अंतरावर येऊन त्याने या बाटलीत पत्नी सखुबाईसमोरच विषारी पदार्थ तसेच पावडर मिसळली. परंतु, हा देवाचा प्रसाद असल्याचे सांगत तिला प्यायला दिले. दुचाकीवरून थोडे अंतर गेल्यानंतर तिला उलटीचा त्रास सुरू झाला. त्याने गाडी थांबविली. रात्रीच्या वेळी सुनसान जागेत नेऊन आधीच चक्कर येत असलेल्या सखुबाईचा त्याने गळा आवळून खून केला.

अपघात भासवण्याचा प्रयत्न

खुनानंतर संतोषने पत्नीचा मृतदेह आधी रस्त्यावर घेतला. तो अपघात भासावा, यासाठी त्याने त्यावरून दोन-तीनदा दुचाकी फिरवली. यानंतर पुन्हा मृतदेह रस्त्याकडेच्या खड्ड्याजवळ नेऊन ठेवला. शिवाय स्वतःही रस्त्याकडेला बेशुद्धावस्थेत असल्याचे भासविण्यासाठी पडून राहिला. हा सर्व प्रकार मुरगोड-शिल्तीभावी रस्त्यावर केला. परंतु, रात्री दहानंतर हा रस्ता सुनसान असल्याने कुणीही फिरकले नाही व अपघातही कुणाला दिसला नाही. रात्री बारापर्यंत झोपल्यानंतरही कोणी येत नाही म्हटल्यानंतर त्याने पोलिस मदत कक्षाला ११२ क्रमांकावर कॉल केला. आपला अपघात झाला असून पत्नी व मी गंभीर असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी दोघांना नेऊन रुग्णालयात दाखल केले. परंतु, पत्नीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

चाणाक्ष पोलिसांनी पकडले

आपल्या पत्नीचा अपघाती मृत्यू झाल्याचे भासवण्यात यशस्वी झालो आहोत, असे संतोषला वाटले. परंतु, घटनास्थळी सापडलेली दुचाकी, दोघेही पडलेली जागा यावरून पोलिसांना संशय आला. संतोषची उलटतपासणी करताच त्याने खुनाची कबुली दिली. गोकाकचे पोलिस उपअधीक्षक रवी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली गोकाक ग्रामीणचे निरीक्षक सुरेशबाबू आर. बी., उपनिरीक्षक के. बी. वालीकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी या खुनाचा छडा लावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news