

अथणी : चारित्र्याच्या संशयावरून पतीने झोपलेल्या पत्नीचा चाकूने वार करून निर्घृण खून केला. अथणी तालुक्याच्या कटगेरी (नंदगाव) येथे रविवारी ही घटना घडली. शोभा परगोंडा सारवाड (वय ३६) असे मृत महिलेचे नाव आहे. परगोंडा सारवाड (वय ४५) असे संशयिताचे नाव आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी, शोभा आणि परगोंडा हे मूळचे अथणी तालुक्यातील खवटगोप्पा गावचे रहिवासी आहेत. उदरनिर्वाहासाठी गेल्या काही दिवसांपासून हे दाम्पत्य अवजिकरा मठात कामाला होते. शोभा ही मठात स्वयंपाकी म्हणून काम करत होती, तर परगोंडा त्याच मठात चालक म्हणून काम करत होता. गेल्या काही दिवसांपासून या पती-पत्नीमध्ये कौटुंबिक वाद वाढला होता. परगोंडा हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. याच कारणावरून त्यांच्यात वारंवार भांडणे होत होती. यातूनच हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी झाली होती. या घटनेमुळे कटगेरी गावात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. अथणी ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी पाठवण्यात आला. खुनानंतर संशयित स्वतः पोलिस ठाण्यामध्ये हजर झाला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून पुढील तपास सुरू केला आहे.