

धारवाड : धारवाड जिल्ह्यातील भाजप नेते योगेश गौडा हत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जामीन रद्द केल्यानंतर काँग्रेसचे आमदार विनय कुलकर्णी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मात्र, त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. मी न्यायालयाच्या आदेशाचा आदर करत असून शुक्रवारी (दि. 13) बंगळूर न्यायालयात हजर राहणार आहे, अशी माहिती त्यांनी मंगळवारी (दि. 10) दिली. धारवाड येथील अधिकार्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, मी शुक्रवारी बंगळूर न्यायालयात हजर राहणार असून माझा कायदेशीर लढा सुरुच राहणार आहे. बलाढ्य नेत्यांमागे अदृश्य शक्ती षड्यंत्र रचणे काही नवीन नाही. ती एक स्वाभाविक गोष्ट आहे. याबद्दल ते काहीही करु शकत नाहीत अन् त्यांना त्याचा सामना करावा लागेल. माझा पक्ष आणि मतदारसंघातील लोक माझ्यासोबत आहेत. माझी पत्नी आणि मुले बाहेर आहेत. सर्व काही सांभाळत आहेत. त्यामुळे, कोणतीही अडचण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
मी मंत्रीपदासाठी इच्छूक आहे. या प्रकरणात काय होते ते मी पाहणार आहे. मला मंत्रीपद देणे हे पक्षाचे काम आहे. माझ्याविरुद्ध कट रचणार्यांना संदेश देण्याची गरज नाही. काळ माझ्या विरोधकांना उत्तर देईल, असा दावा आमदार कुलकर्णी यांनी केला.