

विजापूर : कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या देवरहिप्परगी येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात वीजपुरवठा खंडित झाल्याने अपघातातील जखमींवर मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात उपचार करण्याची वेळ वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर आली.
इंडी रस्त्यावर बोलेरो, टमटम आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात १० जण जखमी झाले. त्यापैकी ५ जण गंभीर असल्याचे सांगण्यात येते. जखमींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर वीजपुरवठा खंडित झाल्याने आपत्कालीन विभागात अंधार पसरला. जनरेटरमध्ये डिझेल नसल्यामुळे तो सुरू करता आला नाही, असा आरोप करण्यात आहे.
या प्रकारावरून जखमींचे नातेवाईक आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये वादही झाला. सुमारे ८.३० कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या ३० खाटांच्या या रुग्णालयात पर्यायी प्रकाशव्यवस्था नसल्याने रुग्णालय प्रशासनाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. गंभीर जखमींना पुढील उपचारांसाठी विजापूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वीजपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यासह जनरेटरसाठी पुरेशा इंधनाची उपलब्धता करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.