

विजापूर : विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील गोट्याळ गावातील एका शेतात ट्रॅकर, जीपीएस आणि कॅमेऱ्यासारखी उपकरणे बसविलेले गिधाड आढळल्याने संशय निर्माण झाले होता. मात्र, वनखात्याने सदर पक्ष्यांच्या जीवनशैलीचा माहिती घेण्यासाठी ट्रॅकर व जीपीएस बसविल्याचे उघडकीस आले. शेतात मोठा पक्षी बसलेला दिसताच स्थानिकांनी तात्काळ 112 नंबरवर कॉल केला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी गिधाडाला ताब्यात घेऊन झळकी पोलिस ठाण्यात हलवले.
गिधाडाच्या पायाला ओळख क्रमांकाचा टॅग लावलेला आढळून आला. त्यामुळे या पक्ष्यावर वैज्ञानिक संशोधन सुरू असल्याचे स्पष्ट झाले. पोलिस ठाण्यात आलेल्या वनाधिकाऱ्यांनी तपासणी केली असता हे गिधाड महाराष्ट्रातील नागपूरजवळील मेळघाट परिसरातून आले असल्याचे समोर आले. महाराष्ट्र वन विभागाने गिधाडांची जीवनशैली, स्थलांतर मार्ग आणि इतर पक्ष्यांविषयी माहिती गोळा करण्याच्या उद्देशाने जीपीएस आणि ट्रॅकर बसवले असल्याची माहिती मिळाली आहे. जीपीएस व ट्रॅकरच्या वजनामुळे गिधाड थकले होते आणि उडू शकत नव्हते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. विजापूर जिल्हा वनाधिकाऱ्यांनी गिधाडाला ताब्यात घेऊन उपचार सुरू केले आहेत. याबाबत महाराष्ट्र वनाधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती विजापूर जिल्हा वनाधिकाऱ्यांनी दिली.