

विजापूर : विजापूर शहर उपविभागातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या चोरीच्या प्रकरणांचा उलगडा करण्यात विजापूर पोलिसांना यश आले आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी दिली.
येथील पोलिस समुदाय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अतिरिक्त पोलिस प्रमुख रामनगौडा हट्टी व डीएसपी नागराज जी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गोलगुंबज सर्कलचे सीपीआय एस. एस. बळिगार तसेच गांधी चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रदीप तळकेरी यांच्या नेतृत्वाखाली गांधीचौक, गोलगुंबज, एपीएमसी, आदर्शनगर व जालनगर पोलीस ठाण्यांतील कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या विशेष तपास पथकांची स्थापना करण्यात आली होती. या पथकांनी जलद कारवाई करत अनेक आरोपींना अटक केली व चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त केला.
गांधीचौक पोलिस ठाणे
2026 मध्ये नोंदवलेल्या 7 प्रकरणांपैकी 6 संशयितांना अटक करण्यात आली. त्यांच्याडून 70 ग्रॅम सोन्याचे दागिने (10.50 लाख), 18 दुचाकी वाहने (15.42 लाख), 1.10 लाख रोख रक्कम, लॅपटॉप व मोबाईल असा एकूण 27.25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गोलगुंबज पोलिस ठाणे
2025 मधील 6 प्रकरणांत 6 संशयित व 2026 मधील 1 प्रकरणात 2 संशयितांना अटक करण्यात आली. 100 ग्रॅम 60 गुंज सोनं (15 लाख), चांदीचा कडे, इनोव्हा क्रिस्टा कारसह एकूण 33.02 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
एपीएमसी पोलिस ठाणे
2026 मधील 2 प्रकरणांत 3 संशयितांना अटक करून 90 ग्रॅम सोने (14.40 लाख) व टेरेनो प्लस कार (4.80 लाख) असा 19.20 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आदर्शनगर पोलिस ठाणे
2025 मधील 10 प्रकरणांत 21 संशयितांना अटक करून 410 ग्रॅम सोने (61.50 लाख), दुचाकी वाहने, हुंडाई कार व इतर साहित्य मिळून एकूण 74.55 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जालनगर पोलिस ठाणे
2025 मधील 1 प्रकरणात 1 संशयित व 2026 मधील 3 प्रकरणांत 4 संशयितांना अटक करण्यात आली. 10 ग्रॅम सोने, 250 ग्रॅम चांदी व 7 दुचाकी वाहने असा 6.30 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
एकूण 2025 मधील 17 प्रकरणांत 28 संशयित व 2026 मधील 13 प्रकरणांत 15 संशयितांना अटक करण्यात आली असून एकूण 1,60,32,000 किमतीचे सोने, चांदी, रोख रक्कम व वाहने जप्त करण्यात आली आहेत.