

विजापूर : इंडी उपविभागाच्या हद्दीत गेल्या तीन वर्षांत घडलेल्या चोऱ्या, लूट व दरोडा प्रकरणांचा पोलिसांनी छडा लावला असून, आंतरराज्य टोळ्यांसह एकूण 42 चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सोने-चांदीचे दागिने, जेसीबी, पिक-अप, स्कॉर्पिओ, ट्रॅक्टरसह सुमारे 1.20 कोटी रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी दिली. गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
इंडी परिसरात मंदिर, घरे, वाहने, फायनान्स संस्था, जनावरे, मेंढ्या, पंपसेट चोरी तसेच लूट व दरोडा प्रकरणे घडली होती. या सर्व प्रकरणांचा तपास करून पोलिसांनी मोठी कारवाई केली असल्याचे निंबरगी यांनी सांगितले. शिरढोण गावातील बिराप्पा मंदिराचे कुलूप तोडून सुमारे 6.51 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. या प्रकरणात महाराष्ट्रातील नागेश मधुकर भोसले याला अटक करून दागिने जप्त करण्यात आले आहेत. टाकळी गावातील मल्लिकार्जुन तेली यांची पिक-अप गाडी चोरीला गेली होती. या प्रकरणात महाराष्ट्रातील विशाल मोळे याला वाहनासह अटक करण्यात आली आहे.
सिंदगी तालुक्यातील यरगळ बी.के. गावातील लक्ष्मी तळवार यांच्या घरातून 4.50 लाख रुपयांचे दागिने चोरीला गेले होते. या प्रकरणात महाराष्ट्रातील शंकर ऊर्फ काशीनाथ भोसले याला अटक करून जप्त करण्यात आले.
गेल्या महिन्यात बसस्थानकात सविता तोरवी यांची सोन्याची चेन लुटण्याच्या प्रकरणात महाराष्ट्रातील दीप परशुराम माळी, अरमान बाबू मिथडे, प्रकाश रामचंद्र मातंगी, कुणाल कुलदीप साळुंखे आणि हर्षद ऊर्फ ओंकार राजसिंग बडगुजर यांना अटक करून 2.90 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कलकेरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गोलगेरी गावात घरासमोर उभी असलेली जेसीबी चोरीला गेली होती. महाराष्ट्रातील शिवाजी रायतमुरे व हुवण्णा बंडगार यांना अटक करून जेसीबी व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. डिसेंबरमध्ये होरथी येथे झालेल्या सोन्याच्या साखळी चोरी प्रकरणात उत्तर प्रदेशातील पुष्पेंद्र गुंधारी दोहिरे याला अटक करून 2.60 लाख रुपयांची साखळी जप्त करण्यात आली.