

कंग्राळी : कंग्राळी खुर्द सरकारी प्राथमिक मराठी शाळेच्या व्हरांड्यातील फरशा फोडून नासधूस केल्याचा प्रकार घडला आहे. गेल्या आठवड्यात हा प्रकार घडला आहे. हा प्रकार करणाऱ्या समाजकंटकांचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे.
शाळेच्या मुख्यप्रवेशद्वार आणि रस्त्याकडील बाजूने संरक्षक भिंतीवरील तारा उचकटून समाजकंटकांनी शाळेत प्रवेश केला. त्यानंतर शाळेच्या मुख्य इमारतीच्या व्हरांड्यातील तीन ठिकाणी दगड आपटून फरशा फोडल्या आहेत. त्यामुळे, मोठे नुकसान झाले आहे. यापूर्वीही अनेकवेळा शाळेतील वस्तूंची चोरी, शौचालय भांडी फोडणे, वर्गखोल्यांचे दरवाजे मोडणे, कौले फोडणे, पत्रे उचकटणे असे प्रकार घडले आहेत. याबाबत पोलिसांत तक्रारही देण्यात आली आहे. परंतु, अद्याप या प्रकारांना आळा बसलेला नाही. ग्रा. पं. सदस्य यल्लापा पाटील यांनी एसडीएमसी सदस्यांसमवेत शाळेला भेट देऊन पाहणी केली. संरक्षक भिंतीवर तारांचे कुंपण वाढविण्याचा सूचना केल्या आहेत.