

बेळगाव : सलग दुसर्या दिवशीही वळीव पावसाने शहरासह उपनगरात हजेरी लावली. मंगळवारपेक्षा आज पावसाचा जोर कमी होता. बुधवारी (दि 23) दुपारी चारच्या दरम्यान ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासह पावसाचे आगमन झाले. अचानक आलेल्या पावसाने सर्वांचीच तारांबळ उडाली.
मंगळवारी पावसाने शहर परिसराला अक्षरश: झोडपून काढले होते. सर्वत्र पाणीचपाणी झाले होते. वादळी वार्यामुळे काही ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटनाही घडल्या. बुधवारीही दमदार पाऊस होईल, अशी शक्यता होती. मात्र, पावसाचा जोर कमी होता. पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचून होते. जोरदार वार्यासह पावसाचे आगमन झाल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित होत होता.
शहर, ग्रामीण भागासह जिल्ह्यामध्येही काही ठिकाणी जोरदार वार्यासह पावसाचे आगमन झाले. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तसेच शाळांवरील पत्रे गेल्याच्या घटना घडल्या आहेत. सौंदत्ती तालुक्यातील गुडनकेरी गावातील शाळेवरील पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले. पावसामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता.