बेळगावातील अश्वत्थामा मंदिरात धुलिवंदनादिवशी हजारो भाविक घालणार लोटांगण

Ashwathama Temple : 'अश्वत्थामा'च्या दक्षिण भारतातील एकमेव मंदिरातील अनोखी प्रथा
Ashwathama Temple in Belgaum
बेळगावातील अश्वत्थामा मंदिरPudhari News Network
Published on
Updated on

बेळगाव : अकरा रुद्र आणि सात चिरंजीवीपैकी एक अवतार ठरलेला, गुरु द्रोणाचार्यांचा सुपुत्र तसेच अमरत्व लाभल्याने महाभारतातील कुरुक्षेत्रातील लढाईचा आजवरचा एकमेव जिवंत साक्षीदार मानला जाणारा अश्वत्थामा यांचे दक्षिण भारतातील एकमेव मंदिर बेळगावात पांगुळ गल्लीत आहे. पांगुळ गल्लीतील या मंदिरात दरवर्षी धुलिवंदनानिमित्त सामूहिक लोटांगण घालण्याची परंपरा आहे. यंदाही हा उत्सव शुक्रवारी (दि. 13) होणार असून हजारो भाविक येथे लोटांगण घालणार आहेत.

Ashwathama Temple in Belgaum
पांगुळ गल्लीतील अश्वत्थामा मंदिरात दरवर्षी धुलिवंदनानिमित्त सामूहिक लोटांगण घालण्याची परंपरा आहे.Pudhari News Network

पांगुळ गल्लीत अश्वत्थामा मंदिर सुमारे तीनशे वर्षांपासून आहे. आठ वर्षांपूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. हे जागृत मंदिर म्हणून ओळखले जाते. येथे कोणतीही मागणी करुन लोटांगण घातल्यास ती पूर्ण होते, अशी श्रद्धा आहे. काही भक्तांकडून नवस पूर्ण झाल्यानंतर लोटांगण घातले जातात. एरवी मंदिरात वर्षभर भक्तांची दर्शनासाठी गर्दी नसते. धुलिवंदना दिवशी मात्र अश्वत्थामाचे आवर्जून दर्शन घेण्याची परंपरा आहे. त्यामुळे सकाळी दहापासूनच सायंकाळी उशिरापर्यंत मंदिर भक्तांच्या गर्दीने गजबजते.

धुलिवंदनादिवशी दुपारी बारा वाजता लोटांगण सुरु होते. दुपारी तीन वाजता संपणार्‍या या सोहळ्यात विविध भागातून आलेले भाविक सहभागी होतात. लोटांगण पूर्ण झाल्यानंतर पूजा करण्यात येते. कर्नाटकसह महाराष्ट्र व गोवा राज्यातील भाविक येथे दर्शनासाठी येतात. दक्षिण भारतात अश्वत्थामा मंदिर हे एकमेव असल्याने या मंदिराविषयी आकर्षण आहे. या मंदिरात धुलिवंदनादिवसापासून रंगपंचमीपर्यंत सलग पाच दिवस श्रीफळ वाढविला जातो. एरवी वर्षभर मंदिरात श्रीफळ वाढविले जात नाहीत, हेदेखील वेगळेपण आहे. मंदिरात रोज सकाळी नऊ वाजता पूजा होते.

मोठ्या उत्सवप्रसंगी गाभार्‍यात मुखवट्याची पूजा होते. इतरवेळी उत्सवमूर्ती ठेवली जाते. जुन्या कागदपत्रांमध्ये आणि वंशावळी सांगणार्‍या हेळवी मंडळींकडे या मंदिराची नोंद आहे. लोटांगणामुळे या मंदिराची ख्याती वाढली आहे.
अनंत भातकांडे, पुजारी, अश्वत्थामा मंदिर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news