

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचा भाऊ गोपाळ जोशी आणि पुतण्या अजय जोशी यांना बंगळूर येथील बसवेश्वर पोलिसांनी अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गोपाळ यांना कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराच्या बाजूच्या लॉजमधून, तर अजय यांना पुण्यातून पोलिसांनी अटक केली आहे. निवडणुकीत उमेदवारी देण्याचे आमिष दाखवत लाखो रुपये उकळल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.
गेल्या लोकसभा निवडणुकीत विजापूर राखीव मतदारसंघातून भाजपला उमेदवारी देण्याचे आश्वासन देऊन लाखो रुपये उकळल्याप्रकरणी या दोघांना अटक करण्यात आली आहे. भाजपचे तिकीट मिळवून देण्याचे आमिष दाखवून विजापूर जिल्ह्यातील नागठाण मतदारसंघाचे माजी आमदार देवानंद चव्हाण यांच्याकडे दोन कोटी रुपयांची मागणी केली होती. याविरुद्ध एफआयआर दाखल होताच गोपाळ जोशी बेपत्ता झाले होते. देवानंद चव्हाण यांच्या पत्नी सुनीता चव्हाण यांनी त्यांच्याविरोधात बंगळूर येथील बसवेश्वरनगर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास हाती घेतला होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे बसवेश्वरनगर पोलिसांनी कोल्हापूर येथून गोपाळ जोशी यांना ताब्यात घेतले आहे.
देवानंद यांनी 2018 मध्ये निजदतर्फे उमेदवारी मिळवून निवडणूक जिंकली होती. 2023 च्या निवडणुकीत ते पराभूत झाले होतेे. त्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केला होता. अभियंता शेखर नाईक यांनी प्रल्हाद जोशी यांचे बंधू गोपाळ जोशी हे आपले परिचयाचे असल्याचे चव्हाण यांना सांगितले. त्यानुसार त्यांनी गोपाळ जोशी यांची भेट घडवून आणली. केंद्रामध्ये आपल्या भावाचा प्रभाव असून, 5 कोटी रुपये दिल्यास उमेदवारी मिळवून देण्याचे गोपाळ यांनी त्यांना सांगितले; पण तेवढी रक्कम नसल्याचे सांगताच 25 लाखांची मागणी केली. काही रकमेचा धनादेशही त्यांनी घेतला. बंगळूरमधील बसवेश्वरनगरातील विजयालक्ष्मी यांच्या घरी तो देण्यात आला. आपण केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याशी संपर्क साधला असून, उमेदवारी मिळणार असल्याचे सांगून त्यांची फसवणूक केल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचे बंधू बेपत्ता असल्याची बातमी सर्वत्र पसरली होती. गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन तातडीने तपासाचे आदेश पोलिसांना दिले होते. त्यानुसार बंगळूर पोलिसांना तपास करून गोपाळ जोशी यांना कोल्हापुरातून, तर अजय जोशी यांना पुण्यातून अटक केली आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी त्यांचे बंधू गोपाळ जोशी, बहीण विजयालक्ष्मी जोशी व अजय जोशी आता संकटात सापडले आहेत.
कोल्हापूर : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या भावाला कोल्हापुरात भवानी मंडप परिसरातील एका लॉजवर छापा टाकून बंगळूर व हुबळी पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पसरताच स्थानिक पोलिस यंत्रणांची शनिवारी तारांबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत स्थानिक पोलिसांना याबाबतची अधिकृत माहिती नव्हती. वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनाही सुगावा लागू न देता कर्नाटक पोलिसांनी कारवाई केल्याचे समजते. कर्नाटकातील एका लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवून देण्याच्या आमिषाने एकाची केंद्रीय मंत्री जोशी यांच्या भावासह पुतण्याने सौदेबाजी करून फसवणूक केल्याची तक्रार हुबळी पोलिस ठाण्यात दोन दिवसांपूर्वी दाखल झाली आहे. हुबळीसह बंगळूर पोलिस संशयितांच्या मागावर होते. मंत्र्यांचा संशयित भाऊ कोल्हापुरात, तर पुतण्या पुण्यात वास्तव्याला असल्याची माहिती समजताच बंगळूर व हुबळी पोलिसांचे संयुक्त पथक दाखल झाल्याचे तसेच एका लॉजवर छापा टाकून एकाला ताब्यात घेतल्याची शहरात चर्चा होती. मात्र, स्थानिक पोलिसांना कारवाईची काहीही माहिती नसल्याचे वरिष्ठांकडून सांगण्यात आले.