बेळगाव ः पुढारी वृत्तसेवा
मालवाहू वाहनातून नेण्यात येणारी 2 कोटी 73 लाख 27 हजार 500 रुपये पोलिसांनी जप्त केले. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेऊन या रकमेबाबत विचारणा सुरू आहे. राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी माळमारुती परिसरात सीसीबीने ही कारवाई केली. सांगलीहून हुबळीकडे जाणार्या एका मालवाहू वाहनातून मोठी रक्कम नेली जात असल्याची माहिती सीसीबीच्या पथकाला मिळाली. पोलिस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग, कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी रोहन जगदीश यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीबीचे निरीक्षक नंदिश्वर कुंभार यांनी सहकार्यांसह सापळा रचून हे वाहन अडवले. यावेळी वाहनात मोठ्या रकमेची बॅग सापडली. ती ताब्यात घेऊन यातील रक्कम मोजली असता ती तब्बल पावणेतीन कोटींची असल्याचे आढळून आले.
जप्त केलेल्या नोटांमध्ये 500, 200 व 100 रू. मूल्याच्या नोटांचा समावेश आहे. या प्रकरणी सचिन मेनकुदळी व मारुती मारगुडे (दोघेही रा. सांगली) यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. ही रक्कम कोठून कुठे नेली जात होती व कशासाठी नेली जात होती, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही रक्कम वाहून नेण्यासाठी वाहनाच्या केबीनमध्ये काही बदल केल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे इतकी मोठी बेहिशेबी रक्कम नेण्यामागील गुढ पोलिसांकडून उकलण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पोलिस खात्याने प्राप्तीकर विभागाला माहिती कळवली असून अधिकारी दाखल झाले आहेत. या घटनेतील मालवाहू टेम्पो पोलिसांनी जप्त केला आहे. माळमारुती पोलिसांत नोंद झाली आहे.
ही रक्कम नेमकी कशाची आहे, याबाबत पोलिस स्पष्टरीत्या सांगताना दिसत नाहीत. परंतु, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही हवालाची रक्कम असल्याचे सांगण्यात येते. सांगलीतून नेमकी कोणी पाठवली, त्याचे नाव संबंधित दोघांना पोलिसांना दिले आहे. त्यामुळे बेळगाव पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.