

बेळगाव : शहरातील उद्यानांची देखभाल करताना, दुभाजकांवर विविध रोपे लावण्यासाठी महापालिकेला बाहेरुन रोपे खरेदी करावी लागतात. विधिमंडळ अधिवेशनावेळी वा कोणताही महनीय व्यक्ती आला असता असा प्रकार घडत असतो. पण महापालिकेवर पडणारा आर्थिक भार आता कमी होणार असून महापालिकेनेच आता दोन ठिकाणी रोपवाटिकांची निर्मिती केली आहे. त्याव्दारे हरित बेळगाव साकारण्याचा आयुक्त शुभा बी. यांचा संकल्प आहे.
बेळगाव दक्षिण मतदारसंघातील गोवावेसमधील महात्मा बसवेश्वर उद्यान येथे एक आणि बेळगाव उत्तर मतदारसंघातील एपीएमसी रोडवरील बाबू जगजीवनराम उद्यान येथे एक अशा दोन ठिकाणी रोपवाटिका विकसित करण्यात आल्या आहेत. दरवर्षी पावसाळा आणि हिवाळी अधिवेशनापूर्वी महापालिका शहरातील उद्याने आणि प्रमुख दुभाजकांत रोपे लावली होती. महापालिकेला ही रोपे खासगी रोपवाटिकांकडून खरेदी करावी लागत होती. त्यामुळे, पैसा खर्च करावा लागत होता. आता रोपवाटिका असल्यामुळे महापालिकेला आपल्या उद्यानांत रोपे लावता येणार आहेत. त्याशिवाय या रोपांची विक्रीही करता येऊ शकणार आहे. त्यातून महापालिकेला लाभ मिळणार आहे.
सिल्वर ओकची 4000 रोपे व विविध फुलांची 6000 रोपे पॉलीबॅगमध्ये उगवण्यात आली आहेत. महापालिकेच्या बागकाम कर्मचार्यांकडून त्यांची देखभाल केली जात आहे. फुलांचे बियाणे आणि पॉलीबॅग खरेदीसाठी खासगी कंपन्यांकडून निधी स्वीकारण्यात येणार आहे. त्यामुळे, महापालिकेवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही. या उपक्रमामुळे शहराची हिरवळ वाढेल आणि अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोतही असेल. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास शहरात इतरही रोपवाटिका सुरु करण्यात येणार आहेत.