

खानापूर : खाद्याच्या शोधात हिंडणाऱ्या दोन हत्तींचा वीजभारित तारेच्या स्पर्शाने मृत्यू झाल्याची घटना सुलेगाळी (ता. खानापूर) येथे आज सकाळी घडली. गेल्या दीड महिन्यांपासून दहा ते बारा हत्तींचा कळप नागरगाळी परिसरातील शिवारात संचार करत आहे. या कळपापैकी दोन हत्तींचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच नागरगाळीचे एसीएफ शिवानंद मगदूम, वनक्षेत्रपाल सचिन होनमणी आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पशुवैद्याधिकारी तसेच पशु तज्ञांच्या उपस्थितीत दोन्ही हत्तींची जागेवरच शवचिकित्सा करण्यात आली. दरम्यान हेस्कॉमच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे.
वन्य प्राण्यांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी सुलेगाळी येथील शेतकरी गणपती गुरव यांनी आपल्या शेताभोवती सोलर कुंपण उभारले आहे. हेस्कॉमच्या वीज वाहिनीची एक तार या सोलर कुंपणाच्या तारेवर पडली होती. त्यामुळे या तारेतून उच्च दाबाचा वीज प्रवाह गेला होता. शेतकरी केवळ रात्रीच्या वेळेस सौर कुंपणात वीज प्रवाह सुरू ठेवतात. दिवसा हा प्रवाह बंद ठेवला जातो. तथापि हेस्कॉमच्या वीज वाहिनीवरील तार तुटून सौरकुंपणावरील तारेवर पडल्यामुळे सौर कुंपणात देखील वीज प्रवाह निर्माण होऊन ही दुर्घटना घडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. परिणामी या दुर्घटनेला कोण जबाबदार आहे. याचा वनखाते तपास करत आहे.
या घटनेत, २० ते २२ वर्षांचा एक नर हत्ती आणि ४० ते ४५ वर्षांचा एक नर हत्ती, जे काही दिवसांपूर्वी शेजारच्या दांडेली जंगलातून अन्नाच्या शोधात तालुक्यात आले होते, त्यांचा मृत्यू झाला आहे. वीज वाहिन्यांवरून विनापरवाना तारा टाकून सोलार कुंपणासाठी वीज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीची पाहणी करून धोकादायक वीज जोडणी तोडण्याची सूचना हेस्काॅमच्या अधिकाऱ्यांना करण्यात आली असल्याचे एसीएफ मगदूम यांनी सांगितले.