निपाणी : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाटात मालवाहू ट्रकने एक दुचाकी, तीन कार, तीन ट्रक अशा सात वाहनांना रविवारी रात्री धडक दिली. या विचित्र अपघातात चौघेजण ठार, तर 11 जण जखमी झाले. घटनेची नोंद निपाणी शहर पोलिसांत झाली आहे. मृतांमध्ये पट्टणकोडोली येथील एका वृद्धाचा समावेश आहे. इतर तिघे कर्नाटकातील आहेत.
जबीन महंमदहुसेन मकानदार (वय 58, रा. दर्गा गल्ली, निपाणी), शिक्षक संतोष गणपती माने (50, मूळ गाव भोज, सध्या रा. खडकलाट), रेखा संजय गाडीवड्डर (35, रा. खडकलाट), दिलदार आदिलशहा ताजुद्दीन मुल्ला (61, रा. पट्टणकोडोली,ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) अशी मृतांची नावे आहेत.
जबीन आणि शिक्षक माने यांचा जागीच मृत्यू झाला; तर दिलदार मुल्ला व रेखा गाडीवड्डर यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. इतर जखमींवर निपाणीतील सरकारी व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रकचालक जितेंद्र मोहिते हा हुबळी येथून कराडकडे जात होता. तो व्हाईट हाऊस हॉटेलसमोर आला असता त्याचा ट्रकवरील ताबा सुटला. संतोष माने व रेखा गाडीवड्डर यांच्या दुचाकीला विरुद्ध बाजूला येऊन ट्रकने धडक दिली. त्यानंतर कंटेनर व आयशर अशा दोन वाहनांना धडक देऊन ट्रक पुन्हा पूर्ववत कोल्हापूरच्या दिशेने आला. संकेश्वर येथून पट्टणकोडोलीच्या दिशेने जाणार्या कारवर तो आदळला. कारमधील जबीन मकानदार या जागीच ठार झाल्या. याचवेळी ट्रकने हुबळी येथून सातार्याकडे जाणार्या कारला समोरून जोराची धडक दिली. या अपघातामुळे बेळगाव-कोल्हापूर मार्गावरील होणारी वाहतूक तब्बल दोन तास विस्कळीत झाली. पोलिस व रस्ते देखभाल कंपनीच्या कर्मचार्यांनी दोन्ही बाजूची वाहतूक सुरळीत केली.
जखमींची नावे पुढीलप्रमाणे : परवीन दिलदार आदिलशाह मुल्ला (51), साफीया अहमद मुल्ला (20), नुसरा आयाज शेख (8, सर्व रा. पट्टणकोडोली, ता. हातकणंगले), जयेश काशिराम देसाई (44), नगदा जयेश देसाई, (37 रा. दादर, मुंबई), जितेंद्र चंद्रकांत मोहिते (35, रा. सातारा), शार्दू शंकर शंकराप्पा (40, रा. तेलंगणा), मंजुनाथ दत्तात्रय तेंडूलकर (52, रा. हुनशी ता. हावेरी), सुपर्णा नीलकुमार नेगलूर (54), श्रेया नीलकुमार नेगलूर (24) यांचा समावेश आहे. या अपघातस्थळी बेळगावचे जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. भीमाशंकर मुळदे, अतिरिक्त पोेलिस अधीक्षक श्रेया यांनी भेट देऊन पाहणी केली.