

कारवार : कारागृहात तंबाखू व सिगारेट देण्यास नकार दिल्याने मंगळूरमधील दोन कुख्यात गुंडांनी जेलर आणि सेवेवर असलेल्या तीन कर्मचार्यांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना शनिवारी (दि. 6) सकाळी कारवार मध्यवर्ती कारागृहात घडली. मोहम्मद अब्दूल फयान व कौशिक निहाल (दोघेही रा. मंगळूर) अशी हल्लेखोरांची नावे आहेत. या हल्ल्यात जेलर कल्लप्पा गस्तींसह तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कारागृहात शनिवारी सकाळी कैद्यांना नाश्ता वाटप सुरु होते. त्यावेळी काही कैद्यांनी नाश्त्याऐवजी तंबाखू व सिगारेट आणून देण्याची मागणी केली. मात्र, कारागृहात सिगारेट व तंबाखू खाण्यास परवानगी नसल्याचे कारागृह कर्मचार्यांनी सांगितले. त्यामुळे, संतापलेल्या दोन कैद्यांनी जेलरसह तीन कर्मचार्यांवर हल्ला चढविला. त्यांनी जेलर आणि कर्मचार्यांचा गणवेश फाडून त्यांना निर्दयीपणे मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.
जखमी जेलर आणि कर्मचारी सध्या उपचार घेत असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. या घटनेनंतर कारागृह प्रशासनाने सुरक्षा आणखी कडक केली आहे. भेटीचे तास तात्पुरते स्थगित करण्यात आले आहेत. या घटनेने राज्याच्या कारागृह विभागात खळबळ उडाली असून वरिष्ठ पातळीवरुन या घटनेची दखल घेण्यात आली आहे.
दोन्ही कैद्यांची ओळख पटविण्यात आली असून ते मंगळूरमधील अट्टल गुन्हेगार आहेत. दोघेही दरोडा, खुनाचा प्रयत्न आणि खंडणीसह 12 हून अधिक गंभीर प्रकरणांमध्ये सहभागी आहेत. मंगळूर मध्यवर्ती कारागृहात प्रचंड गर्दी असल्याने त्यांना काही महिन्यांपूर्वी कारवार कारागृहात हलविण्यात आले होते.