

बेळगाव: क्षयरोग (टीबी) निर्मूलनाचे उद्दिष्ट साध्य करायचे असेल, तर तंबाखू सेवनावर नियंत्रण आणणे अत्यावश्यक आहे. तंबाखूच्या व्यसनामुळे टीबीचा धोका वाढत असून तंबाखूमुक्ती करण्यासाठी जनजागृती करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाचे उपसंचालक डॉ. अनिल यांनी केले.
आयसीएमआर-एनआयटीएम संस्थेत राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम, राज्य तंबाखू नियंत्रण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘टीबी-टोबॅको इंटिग्रेशन अँड कोटपा सेन्सिटायझेशन’ या विभागीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी अनिल बोलत होते. कार्यशाळेत बेळगाव, विजापूर, बागलकोट, धारवाड, गदग, हावेरी आणि कारवार जिल्ह्यांतील ६० हून अधिक जिल्हास्तरीय अधिकारी सहभागी झाले होते.
व्हायटल स्ट्रॅटेजीजचे तांत्रिक सल्लागार डॉ. पुनीत चहर यांनी तंबाखूमुक्ती हा टीबी उपचार अधिक प्रभावी करण्यासाठी महत्त्वाचा घटक असल्याचे सांगितले. संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचा दीर्घकालीन भार कमी करण्यासाठी तंबाखूमुक्ती हा सर्वात किफायतशीर उपाय असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच जिल्हास्तरीय यंत्रणांनी तपासणी, समुपदेशन आणि उपचार संदर्भ सेवांचे जाळे अधिक सक्षम करण्याचे आवाहन केले.
कार्यशाळेतील तांत्रिक सत्रांमध्ये टीबी-तंबाखू एकात्मिक आराखडा, रुग्णांमधील तंबाखू वापराची तपासणी, तंबाखूमुक्ती केंद्रांची कार्यपद्धती आणि जिल्हास्तरीय अंमलबजावणी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी तंबाखू सेवन व व्यसनमुक्तीशी संबंधित कामगिरीचा आढावा घेण्यात आला.
२२ टक्के लोक तंबाखूच्या आहारी
कर्नाटकात सुमारे २२.८ टक्के, म्हणजेच जवळपास ९४ लाख नागरिक तंबाखूचे सेवन करतात. तंबाखू सेवन करणाऱ्या व्यक्तींना सक्रिय क्षयरोग होण्याचा धोका दुप्पट असतो. शिवाय उपचारादरम्यान तंबाखूचे सेवन सुरू ठेवल्यास उपचार यशस्वी होणे अवघड असते त्यामुळे मृत्यूचा धोका वाढतो.