बेळगाव : गणेशोत्सवात शहरात मराठी भाषेतून शुभेच्छा फलक लावण्यात आले आहेत. ते तत्काळ हटवून फलक लावणार्यांवर कारवाई करण्यात यावी, तसेच महापालिकेच्या गणेश मंडपावरील मराठी फलक हटवावा, अशी कोल्हेकुई करत मूठभर कन्नडिगांनी गुरुवारी (दि. 19) महापालिका प्रशासनाला वेठीस धरले. त्यांनी मंडपावरील फलक फाडून कंडू शमवून घेतला.
गणेशोत्सव काळात शहरात मराठी भाषेतून फलक लावलेले असल्यामुळे मराठीद्वेष्ट्या कन्नड संघटनांचा तिळपापड होत आहे. त्यापैकी काहींनी गुरुवारी महापालिकेसमोर आंदोलनाचे नाटक केले. त्यांनी महापालिकेतील अधिकारी कन्नडमध्ये बोलत नाहीत. नामफलक इतर भाषेतही आहेत. त्यामुळे कन्नड भाषेचा अपमान होत आहे, असा आरोप करून अधिकार्यांवर दादागिरी करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी त्यांनी महापालिका आवारातील गणेशमूर्ती मंडपावर कन्नड आणि मराठी भाषांत लिहिलेल्या फलकावर आक्षेप घेतला. त्यांनी हा फलक तत्काळ काढावा; अन्यथा आपण तो फलक काढू, अशी धमकी दिली. त्यामुळे अधिकार्यांच्या सूचनेनुसार महापालिका कर्मचार्यांनी मंडपावर लावलेला फलक हटवला. त्यामुळे कन्नडिगांनी जल्लोष केला; पण त्या फलकाआड लोखंडी पत्र्यावर मराठी कन्नड भाषेत लिहिले होते. त्यामुळे पुन्हा हिरमोड झालेल्या कन्नडिगांनी तो फलक मोडून काढला. मराठीद्वेष्ट्यांच्या या प्रकारामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
गणेश मूर्ती मंडपावरील फलक हटवताना महापालिका महसूल उपायुक्त रेश्मा तालिकोटी, आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे उपस्थित होते. त्यांच्याशीही त्यांनी हुज्जत घातली. भाषाद्वेष करून बेळगावचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणार्या या प्रकाराबद्दल शहरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. यावेळी पोलिस बंदोबस्त राखण्यात आला होता.
मूठभर कन्नडीग महापालिका अधिकार्यांना धमकी देताना तुम्ही महापालिकेत मराठी आणि इंग्रजीचा वापर करता. हा कर्नाटकाचा अपमान आहे. त्यामुळे तुम्ही इतर भाषांचा वापर करू नका. तुम्ही कन्नडशिवाय बोलू शकत नाही, असे सांगितले.