

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा
1924 मध्ये बेळगावात झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद महात्मा गांधींनी भूषविले होते. तेथूनच स्वातंत्र्यलढ्याला चालना दिली होती. यंदा त्याला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त वर्षभर राज्यभर कार्यक्रम आयोजिले जातील, असे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी म्हटले आहे. बेळगावातील काँग्रेस अधिवेशनाला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त बुधवारी महात्मा गांधी जयंतीनिमित्त गांधी यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेस नेत्यांनी बंगळूरसह राज्यभर पदयात्रा केली. बंगळुरातील पदयात्रेत मुख्यमंत्री सिद्धरामय्या, केपीसीसी अध्यक्ष व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली, महिला-बालविकासमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, एच. के. पाटील आदींनी भाग घेतला. महात्मा गांधींच्या तत्त्वांचे पालन करण्याची शपथ उपस्थितांनी घेतली.
यात्रेपूर्वी महात्मा गांधी जयंती कार्यक्रम आणि स्वच्छता आंदोलनअंतर्गत प्रतिज्ञा देवविण्यात आली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महात्मा गांधींच्या ‘खेड्याकडे चला’ या संदेशाची आठवण करून दिली. ते म्हणाले, गांधींनी खेडोपाडी जाऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. त्यांना संघटित केले. स्वातंत्र्यलढ्यात नेतृत्व करताना ब्रिटिशांपासून मुक्त केले. यासाठी त्यांना कारागृहात जावे लागले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र भारताची घटना लिहिली. त्या आधारे सामाजिक, आर्थिक कार्यक्रम जारी केले जात आहेत. काँग्रेस सरकारच्या हमी योजनांमुळे गरिबांची उन्नती झाली आहे.
सध्या वीरसौध नावाने प्रसिद्ध असलेल्या परिसरात पूर्वी सपाट मैदान होते. तेथे 1924 मध्ये महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचे स्वातंत्र्य लढ्यासाठी अधिवेशन झाले होते. त्या अधिवेशनात येणार्या लोकांच्या पाण्याची सोय म्हणून नवी विहीर खोदण्यात आली. तीच विहीर आज काँग्रेस विहीर म्हणून ओळखली जाते. अधिवेशनाकडे जाणारा रस्ता काँग्रेस रोड म्हणून ओळखला जातो. यंदा या अधिवेशनाच्या शताब्दीनिमित्त बेळगावात विविध कार्यक्र्रम आयोजिण्यात येणार आहेत.