Tavandi Ghat shooting case: स्क्रॅप टेंडरच्या वादातूनच घटना

तवंदी घाटातील गोळीबाराचा उलगडा; गावठी पिस्तूल, काडतुसे, कारसह ३ लाखांचा मुद्देमाल जप्त
shooting case
shooting casePudhari Photo
Published on
Updated on

निपाणी : तवंदी घाट परिसरातील हॉटेल व्हाईट हाऊसजवळ झालेल्या गोळीबार प्रकरणाचा निपाणी पोलिसांनी चार दिवसांत उलगडा केला असून स्क्रॅप व्यवसायातील टेंडर आणि आर्थिक व्यवहाराच्या वादातूनच ही घटना घडल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित अरमान आरिफ मोमीन (वय ३२, रा. अशोकनगर, भाग्यश्री कॉलनी, इचलकरंजी) याला अटक करून बेळगावच्या हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. त्याच्याकडून गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे आणि कार असा सुमारे ३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यांतील स्क्रॅप टेंडर व्यवसायाशी संबंधित व्यावसायिकांची बैठक तवंदी घाट परिसरातील हॉटेल व्हाईट हाऊसजवळ शनिवारी (दि. २०) घेण्यात आली. बैठकीदरम्यान दोन गटांमध्ये टेंडर संदर्भातील मुद्द्यांवरून वाद निर्माण झाला. वाद तीव्र झाल्यानंतर अरमान मोमीन याने गावठी पिस्तूल काढून गोळीबार केला. यावेळी सुरेश कलाप्पा खेत्री (वय ४२, रा. ताकारी, ता. वाळवा, जि. सांगली) हे खाली वाकल्याने अनर्थ टळला. त्यानंतर त्‍याने दुसऱ्यांदा गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र खेत्री यांनी जवळील काठीने त्याच्या हातावर वार केल्याने गोळी भिंतीवर आदळली. त्यानंतर मोमीन घटनास्थळावरून फरार झाला. या बैठकीस स्क्रॅप व्यावसायिक शुकराज घाटगे व त्यांचा मुलगा हर्षवर्धन घाटगे उपस्थित होते.

सुरेश खेत्री यांनी निपाणी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. जिल्हा पोलिस प्रमुख के. रामराजन, अतिरिक्त पोलिस प्रमुख आर. जी. बसर्गी यांच्या मार्गदर्शनाखाली डीएसपी गोपाळकृष्ण गौडर, सीपीआय बी. एस. तळवार, उपनिरीक्षक शिवानंद कार्जोळ, हवालदार एम. ए. तेरदाळ, राजू दिवटे, शेखर असोदे आदींच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला. तपासादरम्यान अरमान मोमीनसह त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले. सखोल तपासानंतर मोमीनविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यानंतर त्याची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news