

निपाणी : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटात बुधवारी (दि. 11) दुपारी 4 ते 6 या वेळेत ढगफुटीसदृश पाऊस झाला. घाटमाथ्यावरुन पडणारे पाणी महामार्गावरून वाहू लागल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. रस्ते देखभाल अवताडे कंपनीच्या भरारी पथकासह शहर व संकेश्वर पोलिसांनी वाहतूक सेवा सुरळीत केली. यंदाच्या हंगामात या परिसरात दुसर्यांदा असा पाऊस झाला आहे.
दुपारी चारच्या सुमारास अचानक मेघ दाटून आले अन् गडगडाटात पावसाला सुरुवात झाली. बघता बघता तासभर ढगफुटीप्रमाणे पाऊस झाल्याने घाटमाथ्यावरुन पाण्याचे लोंढे वाहू लागले. पाण्यातून दगड माती वाहत येऊन महामार्गावर येत असल्याचे लक्षात येताच तातडीने घटनास्थळी अवताडे कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक अक्षय सारापुरे यांनी घटनास्थळी कर्मचार्यांचे भेट देऊन वाहतुकीवर परिणाम होऊ नये यासाठी प्रयत्न केले.
महामार्गावर नव्याने बांधकाम सुरु असलेल्या विट भिंत पुलावरुन पाणी जोरात कोसळू लागल्याने पाण्याचा लोट महामार्गावर सर्वत्र पसरला. त्यामुळे, काही प्रमाणात रहदारी विस्कळीत झाली होती. दरम्यान पोलिस व अवताडे कंपनीच्या भरारी पथकाने महामार्गावरुन वाहणार्या पाण्याला वाट करुन देत वाहतूक धिम्या गतीने सुरु ठेवली. केवळ कणगला फाटा ते हॉटेल अमर या टापूत हा पाऊस झाला. दरम्यान या काळात अनेक वाहनधारकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सुरक्षितता म्हणून आपली वाहने रस्त्याच्या बाजूला उभी करुन काही काळ थांबणे पसंत केले.
सध्या तवंदी घाटात कोल्हापूर ते बेळगाव या मार्गावर एका बाजूला फ्लायव्होवरचे बांधकाम सुरु आहे. त्यामुळे, सध्या एकेरी मार्गाने दोन्ही बाजूची वाहतूक सुरु आहे. त्या दृष्टीने प्रशासनाने ठिकठिकाणी सूचनाफलक उभे करुन वाहनधारकांना सुरक्षितता प्राप्त करुन दिली आहे. बुधवारी झालेल्या तुफान ढगफुटीसदृश पावसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.