

संकेश्वर ः बहुप्रतीक्षित बेळगाव-कोल्हापूर ़(कराड-धारवाड) रेल्वे मार्ग प्रत्यक्षात येण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला अखेर संकेश्वरमधून सुरुवात झाली आहे. धारवाड-कित्तूर-बेळगाव कॉरिडॉरचा एक महत्त्वाचा भाग असलेला हा प्रस्तावित रेल्वे मार्ग संकेश्वर आणि कोल्हापूरपर्यंत विस्तारलेला असून तो प्रत्यक्षात आल्यास दोन्ही राज्यांसाठी लाभदायक ठरणार आहे.
बेळगाव-धारवाड-कित्तूर रेल्वे मार्गाचे काम आधीच सुरू झाले आहे. तर बेळगाव-कोल्हापूर रेल्वे मार्गाची पायाभरणीही 12 वर्षांपूर्वी झाली आहे. 2012 मध्ये मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने 191 किलोमीटर लांबीच्या कराड-बेळगाव मार्गाचे सर्वेक्षण केले होते. तर नैर्ऋत्य रेल्वेच्या हुबळी विभागाने पाच्छापूर - संकेश्वर -कोल्हापूरसाठी दोन स्वतंत्र सर्वेक्षणे केली होती. अलीकडेच रेल्वे बोर्डाने 160 किमी प्रतिसास वेग क्षमता धारण करु शकणार्या हायस्पीड ब्रॉडगेज मार्गाला मंजुरी दिली आहे. त्यांतर्गत परकनट्टी-संकेश्वरमार्गे कोल्हापूर विभागासाठी (85 किलोमीटर) प्राथमिक अभियांत्रिकी आणि रहदारी (पीईटी) सर्वेक्षणासाठी 55 लाख मंजूर करण्यात आले आहेत.
सध्या पुण्यातील मोनार्क सर्वेयर्स अँड इंजिनियरींग कन्सल्टंटस् ही कंपनी रेल्वे मार्ग दुपदरीकरण व विद्युतीकरणासह मार्गाचे सर्वेक्षण करत आहे. निपाणी ते कणगला औद्योगिक वसाहतीच्या सीमेपर्यंतच्या भागाचा नकाशा तयार करण्यासाठी संकेश्वरमध्ये ड्रोन कॅमेरे तैनात केले जात आहेत. लक्ष्मी हरगापूर तलाव, अंकलेजवळील चोरगे आणि पिंपळे नाला, संकेश्वरमधील निडसोशी रोड, स्वस्तिक गॅस, गोमदा घाटगे माळा, हाऊसिंग कॉलनी, कमतनूर रोडवरील रवंदी शेत, कमतनूर गेट आणि हुक्केरी मार्गे नेर्ली दर्गा ही सर्वेक्षणाची प्रमुख ठिकाणे आहेत. सर्वेक्षक लाल आणि पांढरे पट्टे ओढून आरेखन करत आहेत. रेल्वे मार्गाला छेदणार्या नाल्यांचा आकार व पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेची माहिती जमा केली जात आहे. सर्वेक्षण अहवाल तयार झाल्यानंतर रेल्वे बोर्ड आणि केंद्र सरकार प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत निर्णय घेतील.