

बेळगाव : मंत्रिमंडळ विस्तारात बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना डावलल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप पसरला आहे. नाराज कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि. ३) सायंकाळी चन्नम्मा चौकात आंदोलन करण्यात आले. आमदार हेब्बाळकर यांना मंत्रीपद द्या, अन्यथा आत्महत्या करु, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी पांगविले.
राज्य मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यात आमदार हेब्बाळकर यांना संधी मिळेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना होती. त्यानुसार त्यांनी तयारी चालविली होती. परंतु, सोमवारी झालेल्या शपथविधीवेळी आमदार हेब्बाळकर यांना संधी देण्यात आली नाही. यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
चन्नम्मा चौकात बेळगाव ग्रामीण भागातील कार्यकर्ते सायंकाळी जमा झाले. त्यांनी सरकारचा निषेध व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी केली. हेब्बाळकर यांनी मागील मंत्रिमंडळात महिला व बालविकास मंत्री म्हणून प्रभावीपणे काम केले आहे. पक्षाच्या विस्तारात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात संधी देण्याची गरज आहे. परंतु, हेब्बाळकर यांना डावलून त्यांच्यावर अन्याय करण्यात आल्याचा आरोप राज्य सरकारवर करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनामुळे परिसरातील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना चौकातून हटविले. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार हेब्बाळकरांना डावलले, महामार्ग रोखला
बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना राज्य मंत्रिमंडळात संधी देण्यात आली नाही. यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी हिरेबागेवाडीजवळ राष्ट्रीय महामार्ग रोखून आंदोलन केले.
राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार सोमवारी (दि. ३) करण्यात आला. यामध्ये माजी मंत्री हेब्बाळकर यांना डावलण्यात आले. ही बातमी कळताच मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली. नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी महामार्ग रोखत आंदोलन केले. आमदार हेब्बाळकर यांनी सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये तीन वर्षे मंत्री म्हणून कार्यक्षमतेने काम केले आहे. डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये त्यांना पुन्हा मंत्रीपद द्यावे, अशी आंदोलकांची मागणी केली.
पक्षासाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या हेब्बाळकर यांना काँग्रेस हायकमांडने न्याय द्यावा. मंत्री म्हणून आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्यानंतर त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळायला हवे. पुढील विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन आणि महिलांच्या प्रतिनिधित्वाला प्राधान्य देण्याच्या उद्देशाने लक्ष्मी हेब्बाळकर यांना मंत्रीपद द्यावे, अशीही मागणी कार्यकर्त्यांनी केली.
कार्यकर्त्यांच्या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील रहदारी काही काळ विस्कळीत झाली होती. वाहनांच्या दोन्ही बाजूने रांगा लागल्या होत्या. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.
हेब्बाळकर समर्थकांचे बंगळुरात आंदोलन
माजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देण्यात आले नाही. यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी बंगळूरमधील चालुक्य चौक परिसरात आंदोलन केले. मंत्री हेब्बाळकर यांना मंत्रिमंडळात संधी मिळेल, असा त्यांच्या कार्यकर्त्यांना विश्वास होता. त्यामुळे शपथविधीसाठी बेळगाव परिसरातील काही कार्यकर्ते बंगळूरला गेले होते. काँग्रेस पक्षाने जाहीर केलेल्या मंत्रिमंडळाच्या यादीत हेब्बाळकर यांचे नाव नसल्याचे दिसून येताच कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. आमदार हेब्बाळकर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे, यासाठी दिल्लीपर्यंत प्रयत्न करण्यात आले होते. ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेत मंत्रीपदाची मागणी केली होती. परंतु, त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला नाही. यामुळे कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.