

जमखंडी : येथील उपकोषागर कार्यालयातील अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना बागलकोट लोकायुक्त पथकाने सोमवारी रंगेहाथ पकडले. या कारवाईत अधिकारी एस. एस. बिरादार आणि त्यांचे सहायक विनायक हनवाड यांना अटक करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार चेतन तरतरी यांनी बागलकोट लोकायुक्त कार्यालयाकडे तक्रार दाखल केली होती. त्यांच्या सासऱ्यांच्या निवृत्ती वेतन व भविष्य निर्वाह निधीची १ लाख ४२ हजार ९०० रुपये रक्कम मंजूर करून देण्यासाठी उपकोषागार कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सुरुवातीला निम्मी रक्कम लाच म्हणून मागितली होती. त्यानंतर तडजोडीअंती ४० हजारची मागणी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.
तक्रारीची शहानिशा करून बागलकोट लोकायुक्त पथकाने सोमवारी सापळा रचून लाच स्वीकारताना एस. एस. बिरादार आणि विनायक हनवाड यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे, अशी माहिती बागलकोट लोकायुक्त विभागाचे पोलिस अधीक्षक एम. बी. नांदगाव यांनी दिली. सदर कारवाई लोकायुक्त विभागाचे डीएसपी सुरेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक यू. एन. कडी, एम. बी. बिरादार, एन. आर. खिलारी व पथकाने केली.