

बेळगाव : वर्षभर विद्यार्थ्यांच्या हजेरीची कल्पना न देता ऐन परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांची हॉल तिकिटासाठी अडवणूक केल्याचा प्रकार शहरातील काही शिक्षण संस्थांमध्ये घडला आहे. त्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून हजार ते दोन हजार रुपये दंड घेऊन ऐनवेळी विद्यार्थ्यांना हॉल तिकिटे देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थी, पालकांना तणावाला सामोरे जावे लागले.
शहरातील एका नामांकित शिक्षण संस्थेतर्फे विद्यार्थ्यांची 75 टक्के हजेरी भरली नाही, त्यासाठी 1,500 ते 2,000 रुपयांची मागणी केली जात आहे. पैसे द्या, अन्यथा हॉल तिकीट नाही. त्यामुळे ऐन परीक्षेत विद्यार्थ्यांची गोची झाली आहे. पालकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. अकरावीची वार्षिक परीक्षा 10 फेब्रुवारीपासून सुरू झाली. शाखानिहाय परीक्षा सुरु होण्याच्या तारखा वेगवेगळ्या आहेत. मंगळवारी कॉमर्स शाखेची परीक्षा सुरू झाली. त्यावेळी शहरातील एका कॉलेजने विद्यार्थ्यांची हॉल तिकिटे अडवत पालकांना बोलावून आणण्याचे फर्मान सोडले.
परीक्षेदिवशीच कॉलेजकडून बोलावणे आल्याने पालक तणावातच कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे त्यांना त्यांच्या पाल्यांच्या हजेरीची कल्पना देऊन ‘परीक्षेला बसायचे असेल तर दंड भरा, अन्यथा मुलांना परत घेऊन जा’, असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला. परीक्षेदिवशीच हा प्रकार घडल्याने भांबावून गेलेल्या पालकांनी हजार ते दोन हजार रुपये दंड भरून मुलांची हॉल तिकिटे घेतली. तथापि, कमी हजेरीची कल्पना आधी का दिली गेली नाही, हा प्रश्न आहे.
काही पदवीपूर्व महाविद्यालयांची परीक्षा आजपासून सुरू होत आहे. विद्यार्थ्यांची प्रत्येक विषयाला 75 टक्के हजेरी सक्तीची आहे. त्या हजेरीबाबत महाविद्यालयांनी पालकांना वेळोवेळी कल्पना देणे आवश्यक आहे. मात्र, अशी कल्पना न देता थेट परीक्षेच्या दिवशी हॉलतिकिटासाठी अडवणूक झाल्याने पालकांकडून संताप व्यक्त होत आहे. परिस्थिती पाहून शिक्षण संस्थांनी मुलांना परीक्षेस बसण्यास अनुमती दिली पाहिजेत. ऐन परीक्षेत मुलांचे खच्चीकरण करू नये, अशा अपेक्षाही पालकांनी ‘पुढारी’कडे व्यक्त केल्या.