

बेळगाव : तुमच्या आवारात किती भटकी कुत्री आहेत, याची माहिती महापालिकेला देण्यात यावी, असे आवाहन आयुक्तांनी खासगी, सरकारी शिक्षण संस्था, रुग्णालये, क्रीडा संकुले, बस आणि रेल्वे स्थानक प्रमुखांना केले आहे.
संस्थांच्या आवारात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव कमी करण्यासाठी तसेच कुत्र्यांची निवारा शेडमध्ये रवानगी करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही कार्यवाही करण्यात येणार आहे, असे आयुक्तांनी कळविले आहे. या कुत्र्यांच्या स्थलांतरासाठी महापालिकेला मदत करण्यासाठी संस्थांनी नोडल अधिकार्याचीही नियुक्ती करावी, अशा सूचना केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जर संस्थेच्या हद्दीतील कुत्र्यांची माहिती देण्यात आली नाही तर कुत्र्यांना स्थलांतरित करण्याचा खर्च संस्थेकडून वसूल केला जाईल. जर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाले तर न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.
भटक्या कुत्र्यांबाबत शहरात रोज तक्रारी येत आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाने कान टोचल्यानंतर महापालिकेने खासगी आणि सरकारी संस्थांना मोकाट कुत्र्यांच्या स्थलांतरात सहभागी केले आहे. लोकांनी तक्रारी केल्या तरी ठोस उपाययोजना राबवण्यात अपयशी ठरलेल्या महापालिकेने आता संस्थांवर भार टाकण्याचा प्रयत्न केला आहे.