

जमखंडी : अवैध गर्भलिंग तपासणी आणि गर्भपात रॅकेटबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे महाराष्ट्रातील जाडर बोबलाद गावात करण्यात आलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये अवैध स्कॅनिंग नेटवर्कचा पर्दाफाश करण्यात आला. या कारवाईत पोर्टेबल स्कॅनिंग मशिनसह अन्य उपकरणे जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती बागलकोटचे जिल्हाधिकारी संगप्पा यांनी दिली. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
बेकायदेशीर नेटवर्कचा पर्दाफाश करण्यासाठी जमखंडी प्रांताधिकारी अधिकारी श्वेता बेडिकर, आरोग्य विभाग वैद्यकीय कायदा उपसंचालक शोभा टी. आर., जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. सुवर्णा कुलकर्णी, रबकवी-बनहट्टी तहसीलदार गिरिष स्वादी आणि आरोग्य विभागाचे मनू यांचा समावेश असलेले विशेष पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने ५ ऑक्टोबर रोजी कारवाई केली. या कारवाईची माहिती देताना वैद्यकीय कायदा उपसंचालक शोभा टी. आर. म्हणाल्या, ५ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास महालिंगपूर येथे या रॅकेटमधील मध्यस्थ असल्याचा संशय असलेल्या कविता बडन यांची चौकशी करण्यात आली.
जाडर बोबलाद हे केंद्र बनवून गर्भाचे लिंगनिदान बेकायदेशीररीत्या केले जात असल्याची माहिती मिळाली होती. कविताने यापूर्वी तीन-चार गर्भवती महिलांना स्कॅनिंग आणि गर्भपातासाठी नेल्याचे सांगितले. या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी स्टिंग ऑपरेशन करण्याचे ठरवले. प्रांताधिकरी श्वेता बेडिकर यांनी गर्भवती महिलेची, उपसंचालक शोभा टी. आर. यांनी नणंद म्हणून, तर डीएचओ डॉ. सुवर्णा कुलकर्णी यांनी आईची भूमिका घेतली. हे पथक रात्री साडेनऊच्या सुमारास जाडर बोबलाद येथे पोहोचले. तेथे निखील तेली याच्याशी संपर्क साधला असता स्कॅनिंग एका फार्म हाऊसमध्ये करण्यात येणार असल्याचे समोर आले. त्यानंतर त्याची आई दनक्का तेली हिने स्कॅनिंगसाठी पैशांची मागणी केली.
मशिन करजगी (ता. जत) गावातील कविता गोडेकर यांच्या घरी ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. या माहितीच्या आधारे पथक करजगी येथील कविता गोडेकर आणि बसवराज गोडेकर यांच्या घरी पोहोचले. तेथे पोर्टेबल स्कॅनिंग मशिनचा वापर करून स्कॅनिंग केले जात असल्याचे आढळून आले. पथकाने छापा टाकून मशिन आणि अन्य उपकरणे जप्त केली. या नेटवर्कचा मुख्य सूत्रधार आणि संशयित बोगस डॉक्टर संजय वाघमारे ऊर्फ पाटील हा कारवाईची माहिती मिळताच फरार झाला आहे. त्याचा शोध सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कारवाईनंतर अधिकाऱ्यांचे पथक महाराष्ट्रातील उमदी पोलिस ठाण्यात गेले. जप्त केलेले पोर्टेबल स्कॅनिंग मशिन अधिकृतरीत्या सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक एम. जगदीश, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. सुवर्णा कुलकर्णी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.