

खानापूर : शेवटच्या श्रावण सोमवारनिमित्त राजहंसगडावरील सिद्धेश्वर मंदिरात देवदर्शनासाठी निघालेल्या बाप-लेकाचा प्रवास काळाच्या घावाने कायमचा संपला. लोकोळी क्रॉस ते तोपिनकट्टी मार्गावर भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी वडिलांनीही उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडलेल्या या भीषण अपघाताने लक्केबैल, लोकोळी परिसरासह खानापूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
पुंडलिक अशोक नांदुरकर (वय २७) याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने घटनास्थळीच मृत्यू झाला. त्याचे वडील अशोक पुंडलिक नांदुरकर (६०) हे अपघातात गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी बेळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, दुपारी तीनच्या सुमारास उपचार सुरू असतानाच त्यांचीही प्राणज्योत मालवली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेवटच्या श्रावण सोमवारनिमित्त पुंडलिक आणि अशोक हे सोमवारी सकाळी दुचाकीवरून तोपिनकट्टीमार्गे राजहंसगडावरील सिद्धेश्वर मंदिराकडे निघाले होते. लोकोळी क्रॉस ते तोपिनकट्टी मार्गावरील एका वळणावर त्यांच्या दुचाकीला समोरून आलेल्या अज्ञात टेम्पोने जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की पुंडलिक यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. हेल्मेट परिधान केलेले असूनही त्यांचा जीव वाचू शकला नाही. ते घटनास्थळीच मृत्युमुखी पडले. मागे बसलेले अशोक नांदुरकर यांच्या डोक्याला व छातीला गंभीर मार लागला होता. अपघाताची माहिती मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी अशोक यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र काही तासांत त्यांचा मृत्यू झाला.
दुचाकीला धडक दिल्यानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, फरार वाहन व चालकाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक लालसाब गवंडी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पुंडलिक नांदुरकर हा उद्यमबाग परिसरातील एका कंपनीत कामाला जात होता. तर त्याचे वडील अशोक हे गवंडी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. कुटुंबातील कर्ते पुरुषच अपघातात दगावल्याने नांदुरकर कुटुंबावर संकट कोसळले आहे.