

रायबाग : एका 55 वर्षीय मुलाने शतक पूर्ण केलेल्या आईला खांद्यावर घेऊन पंढरपूरपर्यंत 220 किमी पायी प्रवास करत विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घडविले. आधुनिक काळातील या श्रावणबाळाचे नाव सदाशिव बन्ने असे असून ते केंपट्टी (ता. रायबाग) तालुक्यातील आहेत. त्यांच्या या मातृप्रेमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सदाशिव गेल्या 15 वर्षांपासून पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. त्यांची आई सत्यव्वा (वय 100) यांनाही विठ्ठल दर्शनाची आस लागली होती. आपली ही इच्छा त्यांनी मुलाकडे व्यक्त केली होती. काहीही करून आईला विठ्ठलाचा दर्शन घडवून आणण्याचा चंग त्यांनी बांधला होता. आईला खांद्यावरून पंढरपूरला नेऊन विठ्ठलाचे दर्शन घडविण्याची त्यांची खूप इच्छा होती. ही इच्छा त्यांनी अलीकडेच पूर्ण करून मातृप्रेमी मुलगा अशी आईकडून शाबासकीची थापही मिळविली.
काही दिवसांपूर्वी ऐन पावसाळ्यातच सदाशिव यांनी आईला खांद्यावर घेऊन पंढरपूरपर्यंतच्या 220 किमी प्रवासाला प्रारंभ केला. त्यांची ही पदयात्रा तब्बल 9 दिवस सुरू होती. ते रोज किमान 25 किमी अंतर कापत होते. प्रवासात आईला कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी त्यांनी घेतली होती. पंढरपूरला पोचल्यानंतर विठ्ठल मंदिराचे शिखर पाहताच त्यांच्यासह आईच्या डोळ्यांतून आनंदाश्रू झळकले. त्यानंतर प्रत्यक्ष विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर आईला झालेला आनंद पाहण्यासारखा होता.
आईची सेवा करणे हे पहिले कर्तव्य मानून आईला दैवत समजून तिला खांद्यावरून विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घडविल्याचा अभिमान आहे. वयाचे शतक पूर्ण केलेल्या आईला विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घडविण्याचे केलेले कार्य एक पुण्य असल्याचे त्यांनी बोलून दाखविले.